व्यायामाचं अस्सल पारंपारिक शास्त्र म्हणजे योगशास्त्र. योग हे एक असे विज्ञान आहे ज्याला तात्विक आधार आहेत. पारंपारिक योगशास्त्रामधून विकसित झालेली व्यायाम पद्धती ही केवळ बाह्य शरीराचे पोषण करीत नाही तर ती मानसिक स्वास्थ्याचा सुद्धा खोलवर विचार करते.
व्यायामाचे महत्व सांगताना आम्हा व्यायामप्रेमींना आणि प्रशिक्षकांना नेहमी एका प्रश्नाला तोंड यावे लागते की, आपण व्यायाम का करायचा? समाजातल्या प्रत्येकाची आपल्या शाररिक आणि मानसिक आरोग्या विषयीची वेगवेगळी मतं ऐकायला मिळतात, स्वतःला फार वैचारिक म्हणवणारे (वास्तविक आळशी) म्हणतात, ’ निसर्गतःच शरीराच्या-जन्म घेणे, वाढणे, क्षय होणे, नष्ट पावणे या क्रिया चालू असतात, मग व्यायामाला इतके महत्व कशासाठी?’ तर काही स्पष्टवक्ते सरळ सांगनू टाकतात…एक ना एक दवस तर सगळ्यांना मरायचेच आहे तर मग व्यायामाचे कष्ट कशाला’ घ्यायचे? किंवा काही मोठ्या अभिमानाने सांगतात, ’मी काही जाड नाही किंवा मला काही व्याधी , आजारही नाहीत मग मला व्यायामाची काय गरज?
वरील सर्व आणि यासारख्या अनेक शंकांचे उत्तर जरा विचार करता आपले आपल्यालाच मिळू शकते.
जन्म-मरणापर्यंतचे चक्र हे केवळ मानवी शरीराच्याबाबतीत नाही तर प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती या सगळ्यांच्या बाबतीत घडताना दसते. पण सृष्टीतील इतर सगळ्या घटकांपेक्षा मानवी शरीर हे खूप वेगळं आहे, खपू उत्क्रांत झालेले आहे. शिवाय सध्या आपण सगळेच नैसर्गिक जीवनशैली पासून खूप लांब गेलो आहोत. आपल्या झोपण्या-उठण्याच्या वेळा, खाण्या- पिण्याच्या सवयी , यात करावे लागणारे कृत्रिम बदल हे केवळ शरीरालाच घातक ठरत नाहीयेत तर त्यामळे आपली मानसिकता सुद्धा बदलतेय. अस्वस्थता वाढतेय. माणूस जितका बुद्धीजीवी होत जाईल तितके त्याचे शारीरिक, मानसिक प्रश्न वाढत चालले आहेत, ज्यामुळे आरोग्यासाठी त्याला व्यायामाची गरज निर्माण झाली आहे.
- मानवी शरीर मोठं होत असताना त्याचा मेंदू देखील मोठा होत असतो. इतर प्राण्यांपेक्षा त्याची विचार करण्याची क्षमता जास्त असते. पोट भाराने, विश्रांती घेणे, प्रजनन करणे या पेक्षा खूप पुढे जाऊन मानव स्वत:चे जीवन विविध प्रकारे समृद्ध करत असतो. महत्वाकांक्षा, कर्तव्य, ध्येयपूर्ती यासारखे मानवी जीवनाचे अनेक पैलू आहेत.
- स्पष्टपणे दिसणारा शारीरिक फरक म्हणजे सरळ उभा मेरुदंड : इतर प्राण्यांप्रमाणे तो जमिनीला समांतर नाही.
- अनेक प्रकारच्या क्रिया एकाचवेळी करण्याची क्षमता, मनाचा आणि शरीराचा तोल सांभाळण्याची क्षमता.
- सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही एकापेक्षा दुसरी वेगळी असते. एकसारखी दुसरी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.
सृष्टीतील इतर प्राण्यांपेक्षा आपला वेगळेपणा टिकवून ठेवण्यासाठी आणि आपल्या आपल्यातील वेगळेपणाची जाणीव ठेवून एकमेकांशी सहयोगाने, संयमाने वागण्यासाठी काही विशेष कष्ट घेणे आवश्यक आहे.
- यम = वैयक्तिक वर्तणुकीचे नियम.
- नियम = सामाजिक बांधिलकी विषयी नियम.
- आसन = शरीर स्थिती, शरीरावर नियंत्रण.
- प्राणायाम = श्वासावर नियंत्रण.
- प्रत्याहार = इंद्रियांना विशायोपभोगाच्या आहारी जाण्यापासून दूर ठेवणे.
- धारणा = एखाद्या विषयावर मन केंद्रित करणे.
- ध्यान = एककेंद्रित होणे.
- समाधी = स्व-स्वरुपाची जाणीव होणे.
या आठाही अंगांचा एकत्रितपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. योग आणि त्याची ही आठ अंगे यांचा आपल्या दैनंदिन जीवनात अतिशय डोळसपणे आपण उपयोग करून घेतल्यास अनेक लाभ होतात.
नियमित योगाभ्यासाचे फायदे:
- योगाभ्यासाने शरीर लवचिक होते. शरीर सुदृढ बनते.
- मनावर नियंत्रण ठेवता येते.
- काही विशिष्ट योगाभ्यासांमुळेव्याधींची तीव्रता कमी करता येते, त्यांच्यापासून मुक्ती मिळू शकते.
- लक्ष एककेंद्रित होते.
- स्मरणशक्ती वाढते.
- स्वत:च्या क्षमतांची जाणीव होते.
- आत्मविश्वास वाढतो.
- दुसऱ्याला सामावून आणि समजून घेण्याची आपली क्षमता, सहनशक्ती, चिकाटी वाढते.
योग ही एक लक्षपूर्वक शिकण्याची कला आहे. या कलेची पहिली पायरी आपल्या शरीरावर ताबा मिळवणे आणि मन निरोगी ठेवणे. त्यासाठी आसन आणि प्राणायामाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायला हवे. योग्य मार्गदर्शन करून, योगाभ्यासातील रुची अधिकाधिक वाढविणे ही योगशिक्षकाची जबाबदारी असते. आणि योगाभ्यास करताना मनाला आनंद वाटणे हे लक्षण म्हणजे योगाभ्यास योग्य रितीने केला जात आहे याची खात्री !
योगाभ्यासावरील या लेखमालेत आपण यापुढे शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित विविध पैलंवर चर्चा करणार आहोत. तुमच्या शंका आणि प्रश्न स्वागतार्ह आहेत.