एखाद्या अन्नपदार्थात अनेकविध कारणांमुळे समाविष्ट केलेले घटक म्हणजे ऍक्टिव्हिटीज. खाद्यपदार्थांमध्ये मूलतः ऍक्टिव्हिटीजआढळून येत नाहीत. आज फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजमध्ये २८०० हून अधिक ऍक्टिव्हिटीज वापरले जातात. यांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे प्रीझर्व्हेटीव्ह्ज, अनैसर्गिक स्वीटनर्स आणि रंग हे सध्या सर्वाधिक प्रचलित आहेत.
पदार्थ दीर्घकाळ टिकवण्याच्या दृष्टीने प्रीझर्व्हेटीव्ह्ज, मधुरता आणण्यासाठी स्वीटनर्स, त्यांना एक सुरेख लुक देण्यासाठी रंग तर रुचकर बनवण्यासाठी अजिनोमोटो यांचा वापर केला जातो. हॉटेल्स, स्वीटमार्ट्स, फूड स्टॉल्स जिथे अशा ऍक्टिव्हिटीजच्या वापराला कसलाच निर्बंध नसतो, तिथे सढळ हस्ताने वापरल्या जाणाऱ्या या घटकांचे प्रमाण बहुतांशी वेळा सुरक्षा पातळीपेक्षा जास्त असते. आकर्षक रंग खाद्यपदार्थाची ग्राह्यता वाढवतात यात शंकाच नाही. वेटोळ्यांनी गुरफटलेली रसरशीत जिलेबी, शुगर कँडी पांढऱ्या किंवा रंगहीन असतील तर खायला मजा येणार नाही. परंतु पदार्थ कलरफुल करण्यासाठी त्यात मिसळल्या जाणाऱ्या अमाप कृत्रिम रंगांचाही विचार केला पाहिजे. कलरफुल पदार्थ म्हणजे ताजा आणि स्वादिष्ट असे आपण समीकरण करतो म्हणूनच तर आपल्याला गडद हिरव्या रंगाच्या सूपचे आकर्षण वाटतं. हा हिरवा रंग ताज्या भाज्यांचा असेल असं विचार आपण करतो. हा रंग बहुतेकवेळा पदार्थाला देखणेपणा आणण्यासाठी वापरलेल्या कृत्रिम रंगामुळेही असू शकतो. नैसर्गिक रंग आणि कृत्रिम रंग यांतील फरक ओळखता आला पाहिजे. पदार्थातील दोष किंवा त्रुटी झाकण्यासाठीही कधीकधी अशा कृत्रिम रंगांचा वापर केला जातो. या रंगांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर कॅन्सर सारख्या भयंकर रोगांना आमंत्रण ठरू शकतो. रस्त्यावरील चायनीजच्या गाड्यांवरील लाल भडक मंचुरियन सारखे पदार्थ बनवताना त्यावर असे कृत्रिम रंग, अजिनोमोटो, प्रचंड प्रमाणात तेल यांचा मारा केलेला असू शकतो हे ध्यानात ठेवले पाहिजे.
खाद्यपदार्थांवर प्रक्रिया करताना त्याचे पोषणमूल्य कमी होते. ते भरून काढून पदार्थ परिपूर्ण बनवण्यासाठी मग पोषक द्रव्यांचा मारा केला जातो. असे अतिरिक्त प्रक्रिया केलेले ‘रसभरीत’ पदार्थ टाळणे हेच योग्य. मूळ पदार्थातच समाविष्ट असलेल्या पोषक द्रव्यांसारखे, अनैसर्गिक पोषण द्रव्यांचे पचनही होत नाही. कृत्रिम स्वीटनर्सचेही असेच आहे. अशा घटकांचा वापर आणि सुरक्षितता हा वादाचा विषय ठरेल.
सांगायचा मुद्दा असा की भविष्यकाळातील शारीरिक तक्रारींपासून दूर राहण्यासाठी आपण काय सेवन करतो याबाबतीत दक्ष असणे गरजेचे आहे. जे पदार्थ आपल्या शरीराला आवश्यकच नाहीत ते सेवन करून आपल्या प्रकृतीत का बरं बिघाड करावा? तयार पदार्थ घेताना त्यावरील लेबल काळजीपूर्वक तपासून पहा. खाद्यपदार्थांत वापरले जाणारे ऍक्टिव्हिटीज याबाबत जाणून घ्या. ब्लडप्रेशर चा त्रास असलेल्या लोकांनी तर तयार पदार्थांच्या लेबलवरील सोडियमचे विविध घटक तपासून पाहिले पाहिजेत. कोणत्याही घटकाच्या शेवटी ‘ose’ असेल तर तो शुगर चाच एक प्रकार आहे हे ध्यानात असू द्या.
हलक्या रंगाचे ड्रायफ्रुट्स, गूळ घेणे टाळावेच कारण त्यावर सल्फाईट वापरून प्रक्रिया केली असण्याची शक्यता असते. यांमुळे अस्थमाचा धोका संभवतो.
ताज्या आणि घरगुती खाद्यपदार्थांपेक्षा साठवून ठेवलेल्या पदार्थात ऍक्टिव्हिटीजचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच तयार खाद्यपदार्थ निवडताना अतिशय दक्षता घ्या.