Mayurpankh

नमस्कार सुजनहो!

आज मयूरपंख या पहिल्यावहिल्या जीवनशैलीला वाहिलेल्या मराठी साईटची सुरुवात करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

मुळात जीवनशैली म्हणजे काय असं म्हटलं तर माणसाच्या आजूबाजूच्या घटकांचे त्याच्या जीवनाच्या विविध अंगांवर होत जाणारे परिणाम असं ढोबळ मानानं म्हणता येईल. मग घरापासून ते पालकत्वापर्यंत आणि फॅशनपासून ते कलेपर्यंत असा जीवनशैलीचा विस्तृत आलेख देखील मांडता येईल. उदारीकरणाचे बरेवाईट परिणाम बघत मोठी झालेली आजची तरुण पिढी एका मोठ्या आर्थिक स्थित्यंतरातूनही गेली, किंबहुना आताही जाते आहे. त्यांचं आर्थिक जीवनमान सुधारलं, पर्यायाने त्यांची जीवनशैलीही खर्‍या अर्थानं गेल्या काही वर्षात कमालीची बदलली आहे.

कामाच्या बदललेल्या वेळा, हातात खेळणारा पैसा, अत्यंत वेगवान जीवन या सगळ्याच बाबींनी आजच्या पिढीचं जगणं कमालीचं बदलत चाललं आहे. ठराविक भारतीय ब्रँड, ठरलेल्या कामाच्या वेळा किंवा वर्षानुवर्षे त्याच दुकानातून घेतला जाणारा माल या गोष्टी या पिढीसाठी राहिलेल्या नाहीत. त्यांच्यासमोर अनेक पर्याय उभे असतात, त्यांनी आयुष्याचा वेग कमालीचा वाढवत नेलेला आहे.स्वतःचं आधुनिक उपकरणांनी सुसज्ज घर, जागतिक स्तरावरच्या उत्तम कलाकृतींशी झालेली ओळख किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातल्या फॅशन या फक्त ऐकायच्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. आजच्या पिढीसाठी हे सगळं अगदी खरंखुरं वास्तव बनलेलं आहे. साध्या किराणामालाच्या दुकानाला हळूहळू पर्याय मिळाले, मॉलसंस्कृतीला या पिढीनं आपलंसं केलं, इंटरनेटवर खरेदी करण्याचीही सवय होत गेली. त्याचबरोबरीनं या पिढीच्या स्वतःच्या नवीन समस्याही उभ्या राहिल्या. आणि दिवसेंदिवस त्या वेगवेगळ्या शारिरीक, मानसिक आजारांच्या रुपाने समोर येत आहेत.

मराठीत या विषयाला केंद्र्स्थानी ठेवून काहीतरी करावं, या उद्देशाने ‘मयूरपंख’च्या कल्पनेची सुरुवात झाली. या साईटवरील वेगवेगळ्या विभागांत जीवनशैलीच्या वेगवेगळ्या घटकांना स्पर्श करण्याचा आमचा मानस आहे. घरकुल या विभागात घरांची मांडणी, त्यातले सध्याचे नवे प्रवाह ते पालकत्व अशा विविधांगी विषयांवर लेखमाला असतील. कला विभागात उत्तमोत्तम कलाकृतींबद्दल माहिती देण्याचा किंवा त्यांचे रसग्रहण करण्याचा आमचा प्रयत्न असेल , तंत्रज्ञान या विभागात नवीन अॅप्सपासून ते नवीन तंत्रज्ञानापर्यंतचा आढावा घेतला जाईल. भटकंतीच्या विभागात काही हटके भटकंत्या ते अगदी भन्नाट झालेली सहल असं सगळं मांडण्याचा आमचा मानस आहे. त्याचप्रमाणे अन्न विभागात नवीन पाककृती, पाक्शैलींची ओळख व आरोग्य विभागात उत्तम आरोग्यासाठीच्या विविध घटकांबद्द्ल लिहिले जाईल. फॅशनसारख्या आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करणार्‍या विभागालाही आम्ही साईटवर समाविष्ट केलेले आहे.

तर हा विविध विभागरुपी मयूरपंख आम्ही आपल्या भेटीस आणलेला आहे. अजून बरेच बाकी आहे याची जाणीव आम्हाला आहेच. पण तरीही आमचा हा प्रयत्न कसा वाटला, तुम्हाला यावर काय वाचायला आवडेल किंवा तुमच्या अपेक्षा जाणून घ्यायलाही आम्हाला आवडेल. तुम्हालाही तुमच्या अनोख्या जीवनशैलीविषयी लेख द्यायचे असतील तर आमच्या इमेल पत्त्यावर नक्की संपर्क साधा. तुमच्या शुभेच्छा आम्हाला हव्याच आहेत, तर मग होताय ना सामील मयूरपंखांच्या रंगात? 🙂

Scroll to Top