आपण आहार का घेतो? उत्तर अगदी सोपे आहे ! आपली भूक भागविण्यासाठी . हे जरी खरं असले तरी त्याला आणखीही कारण आहे. आहार हा केवळ भूक भागविण्यासाठी किंवा जिभेचे चोचले पुरविण्यासाठी घेतला जात नसून प्रामुख्याने शरीराचे पोषण करण्यासाठी असतो.
आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी शरीराला अनेक जीवनसत्वांची आवश्यकता असते. शरीराच्या वाढीसाठी, रचनात्मक जडणघडणीसाठी तसेच स्नायूंच्या कार्यक्षमतेसाठीही प्रथिनांची गरज असते. त्याचप्रमाणे निरोगी स्वास्थ्यासाठी लागणारी उर्जा पुरविण्यासाठी कर्बोदके व मेद यांची गरज असते.
आपण सोयीस्कररीत्या आहाराच्या पोषक तत्वाकडे दुर्लक्ष करतो नाहीतर आपण अत्यंत पौष्टिक आहाराची निवड केली असती. आपण नेहमीच जंक फूड , प्रक्रीयीत अन्न , तयार मिश्रण यांनाच प्रध्यान देतो , यांतच आनंद मानतो ही वस्तुस्थिती आहे. यांतून हेच दिसून येते की आपण पौष्टीकतेपेक्षा चव, सुखसोय यालाच जास्त महत्व देतो.
स्वास्थ्य म्हणजे केवळ आजाराचा अथवा रोगाचा अभाव एवढाच नाही , तर अनुकूल उर्जा पातळीबरोबरच मानसिक, भावनिक आणि शारीरिक सुस्थिती म्हणजे आरोग्य होय. तंदुरुस्तीसाठी आपण आवश्यक पोषक द्रव्यांनीयुक्त असा हितावह , कमीत कमी प्रकिया केलेला आहार घेणे गरजेचे असते.
बाजारात उपलब्ध असलेले जंक फूड किंवा एम्प्टी कॅलरी फूड हे त्याचे शेल्फ लाईफ वाढविण्यासाठी अथवा त्याची चव सुधारण्यासाठी अत्यंत प्रक्रिया केलेले असते. अशा पदार्थांमध्ये मुलभूत पोषक तत्वांचा अभाव असतो.
आहाराकडे चैनीच्या किंवा मजेच्या दृष्टीने बघू नका, त्यासाठी छंद, भटकंती, मित्र परिवार अशा अनेक गोष्टी असतात. आहार घेण्यापूर्वी स्वत:लाच एक सोपा प्रश्न विचारा ‘हे अन्न कोणत्याही प्रकारे माझ्या शरीराचे पोषण करणारे आहे का ? याचे उत्तर जर नाही असेल तर असे अन्न खाणे टाळा.
हीच वेळ आहे आपला आहाराबद्दलचा दृष्टीकोन बदलण्याची. चुकीच्या आहार पद्धतीमुळे आपले आरोग्य धोक्यात आहे. मग आपण काय करू शकतो तर पथ्याहार करू नये, कारण पथ्याहार आजन्म करणे शक्य नसते. आपल्या जीवनशैलीत आयुष्यभर पाळता येतील असे सुयोग्य बदल करणे गरजेचे आहे.
चांगल्या आहाराची निवड करा, आरोग्यदायी ताजे अन्न खा. मग आजपासूनच सकस आणि संतुलित आहार घेण्यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न करा. चांगल्या आरोग्य साठी आहार घ्या.
लक्षात ठेवा, जेव्हा आरोग्य चांगले असेल तेव्हाच जीवनाची मजा लुटता येईल.
– शमा अरुण