Mayurpankh

जंक फूडची क्रेझ

बदलती जीवनशैली आणि राहणीमानामुळे लहान मुलांच्या भावविश्वात खूप बदल होत आहे. या वेगाने बदलत्या युगाशी जुळवून घेण्यासाठी नाती, जीवनशैली यांत अमुलाग्र बदल होताना दिसत आहेत, आहारही याला अपवाद राहत नाही. आरोग्यपूर्ण आहाराची जागा अलीकडे जंक फूडने घेतली आहे. जंक फूड म्हणजे काय तर पटकन उपलब्ध असलेले, सोयीस्कर आणि फॅशनेबल फूड. हे जंक फूडच जाळं समाजातील सर्व वयोगटात पसरले आहे आणि आता लहान मुलेही याकडे आकर्षित होत आहेत. सध्या अचानकपणे वेफर्स, कोला,पिझ्झा आणि बर्गर अतिशय महत्वाच्या गोष्टी झाल्या आहेत. शाळेतून घरी आल्यावर टीव्हीसमोर बसून वेफर्स आणि कोला घेऊन बसलेली मुले हे दृश्य हल्ली वारंवार बघायला मिळते. जंक फुडच्या संभाव्य धोक्यांपासून अनभिज्ञ असलेल्या मुलांनी फास्ट फुडच्या जगात पाऊल टाकले आहे.

६ ते १२ या वाढत्या वयात चांगले पोषण मिळणे ही प्राथमिक गरज असते. आपल्या आहाराचा आपल्या वाढीवर, वागणुकीवर होणाऱ्या परिणामांची मुलांना जाणीव असणे आवश्यक आहे. अलीकडे दैनंदिन जीवनातील चढ-उतार, ताण आणि घरगुती कामे यामुळे पालकांना आपल्या मुलांना वेळ देणे अवघड झाले आहे. एकत्रित जेवण, थोड्याश्या गप्पा असे खेळीमेळीचे वातावरण आता फार दुर्मिळ झाले आहे आणि त्यामुळे पारंपारिक आहार शैली, त्याचे महत्व पालकांकडून मुलांकडे जात नाहीत. पोषण हे आहाराचे प्राथमिक कारण आहे याचा आपल्याला विसर पडत चालला आहे.

फार पूर्वीपासून अन्नाला पूर्णब्रह्म असे संबोधले जाते. परंतु हीच खाद्य संस्कृती आता चुकीच्या पद्धतीने बांधली जात आहे. टीव्ही आणि सुपर मार्केट यांसारखी माध्यमे विविध प्रकारचे मोहक आणि भुरळ घालणाऱ्या, आकर्षक पॅकिंग असलेल्या जंक फूडचा प्रसार करतात. अशा सततच्या जंक फुडच्या मार्केटिंगमुळे लहान मुले त्याकडे झपाट्याने आकर्षित होत चालली आहेत. मुलांचे संरक्षण करणारे वातावरण आपल्यालाच निर्माण केले पाहिजे कारण सध्याच्या लोभस वातावरणामुळे आहार पद्धती अक्षरशः चुकीच्या वळणावर आहे. चुकीचा आहार आरोग्यावर घातक परिणाम करू शकतो. जंक फूडमध्ये वापरलेले कलर्स सहसा खाण्यायोग्य नसून पचनसंस्था बिघडवण्यास तसेच कॅन्सर होण्यास कारणीभूत असतात.

 

रोजचा आवश्यक आहार ज्यात चपाती, भाजी किंवा इडली, उपमा या ऐवजी जंक फूडचा वापर जास्त प्रमाणात होतो. सकस आहारातून जी तृप्ती आणि समाधान मिळते ते जंक फूडमधून मिळत नाही. जंक फूडचे आहारावर होणारे परिणाम आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम बघता मुलांना त्यापासून दूर ठेवण्यातच शहाणपणा आहे.

Email
Facebook
Twitter
Pinterest

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top