रात्रीची वेळ… मंद पिवळा प्रकाश आणि एका लग्नातील वरातीतलं दृश्य.. आपल्याच धुंदीत नाचणाऱ्या वर्हाड्यांमध्ये चार-पाच आगंतुक तरुण दाखल होतात आणि तेही नाचू लागतात. सगळेच बेभान! इतक्यातच त्यांच्यापैकी एक स्टायलिश तरुण खिशातून बंदूक काढतो. आणि मजामस्तीतच खेळातली बंदुक असल्याप्रमाणे बार काढतो. क्षणार्धात सगळं चित्रच पालटतं. कारण गोळी खुद्द नवरदेवाला लागलेली असते आणि तो घोड्यावरच निष्प्राण होऊन पडलेला असतो.
तुमच्यापैकी मिर्झापूर ही लोकप्रिय वेब सिरीज ज्यांनी पाहिली आहे त्यांना हे दृश्य लगेचच आठवेल. सीझन वन च्या पहिल्या एपिसोडची सुरुवातच या दृश्याने होते आणि इथे सुरू झालेला रक्तपात सिझन दोन मध्येही कायम राहतो.
अर्थात मिर्झापूर हे एक उदाहरण झालं. सध्या कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहिलं तर ही अशी रक्तरंजित दृश्य सर्वसामान्य झाली आहेत. त्याच बरोबर बेसुमार शिवीगाळ, लैंगिक संबंधांचा खुलं चित्रण आणि अंगप्रदर्शन, अमली पदार्थ सेवन या गोष्टी पाहतानाही आपल्याला तितकसं गैर काही वाटत नाही कारण आता हे सगळं मनोरंजन विश्वाचा एक भाग झालं आहे. आणि दुर्दैवाने जास्तीत जास्त टीआरपी या अशा गोष्टींना मिळतो आहे. तरुण मुले खुलेपणाने तर मध्यमवयीन प्रौढ व्यक्ती लपून-छपून या सिरीजचा आस्वाद घेताना दिसून येत आहेत.
जेव्हा असं का? हा विचार केला तेव्हा दोन महत्त्वाची कारणं लक्षात आली. एक म्हणजे अजून तरी ओटीटी प्लॅटफॉर्म्सना सेन्सॉरची कात्री लागलेली नाही आणि दुसरे आणि महत्वाचे कारण म्हणजे मनुष्य स्वभावाची डार्क, नकारात्मक बाजू प्रेक्षकांना फार पटकन अपील होते. जे रोजच्या गुळमुळीत आयुष्यात, अन्यायकारक परिस्थितीत करणं अनेकांना जमत नाही ते या अशा ठिकाणी पाहून फॅन्टसीत रमायला लोकांना आवडतं आणि त्यातील आक्रमक, हिंसक, रक्तरंजित, दुःखी आणि एकूणच डार्क दृश्यांमुळे कुठेतरी मानवी अंतर्मनातील नकारात्मक भावनांचं शमन होत असावं.
तसं पाहायला गेलं तर आक्रमकता ही एक नैसर्गिक मानवी प्रेरणा आहे. पण त्याचबरोबर सहृदयता, माणुसकी, समूह प्रेम ह्या ही तितक्याच नैसर्गिक प्रेरणा आहेत. हे सगळं पाहताना एक मानसशास्त्राची अभ्यासक म्हणून मनात विचार आला की माणसाचा चांगुलपणा अधोरेखित करणाऱ्या अशा किती सिरीज इतक्यात निघाल्या आहेत? मानवाने नेहमी कितीतरी कठीण प्रसंगांवर सहृदयता, असीम धैर्य, प्रेम यांच्या जोरावर मात केली आहे. परंतु सध्या असं दिसून येतं की मानवी मनाची, स्वभावाची नकारात्मक बाजूच रंगवून समोर आणली जात आहे. पूर्वीसारखे साधे, सोपे, आनंदी जगणे दाखवणारे सिनेमे/ सिरीज यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी झाली आहे. आणि या सगळ्या नकारात्मक चित्रामध्ये मानवी मनाच्या सकारात्मक बाजू कडे दुर्लक्ष होत आहे किंवा ती झाकोळून जात आहे. त्यामुळे एकुणातच मनुष्यप्राण्यात काही चांगुलपणा/चांगले गुण शिल्लक आहेत की नाही हा प्रश्न उभा राहतो आहे.
मन एव मनुष्यः।। आपल्याला मन आहे म्हणूनच आपल्याला मनुष्य असे म्हटले जाते. हे मन म्हणजे आपल्या जगण्यावागण्याचे केंद्रस्थान आहे. मन ही जरी एक अमूर्त संकल्पना असली तरी शास्त्रीयदृष्ट्या मन म्हणजे आपल्या मेंदूचेच एक कार्य आहे. भावना, विचार, निर्णय, स्मृती, संवेदना, बुद्धिमत्ता यांच्या एकत्रित संयोगातून निर्माण होते ते मन.
अशा या आपल्या मनाला दोन पैलू आहेत. सकारात्मक आणि नकारात्मक! सकारात्मक बाजू आपल्याला मानसिक स्वास्थ्याकडे नेते म्हणजे आपण त्यामुळे मानसिक आरोग्य अनुभवतो तर नकारात्मक बाजू अस्वास्थ्य निर्माण करते. परंतु ही नकारात्मक बाजूही आपल्या मनाचा अविभाज्य घटक आहे. तिच्याकडे दुर्लक्ष न करता त्यावर अधिकाधिक काम करून त्याचा आपल्या वागण्या वरील प्रभाव नक्कीच कमी करता येईल. अर्थात हे मानसिक अस्वास्थ्य म्हणजे मानसिक अनारोग्य! मानसिक आरोग्याची दुसरी बाजू. मागे उल्लेख केल्याप्रमाणे मानसिक व्याधी- विकारांचा अभाव म्हणजे मानसिक आरोग्य हा एक अतिशय संकुचित दृष्टिकोन आहे. आणि त्यावर सखोल चर्चा होणे आणि जाणीव जागृती निर्माण होणे गरजेचे आहे.
मनस्वास्थ्य ही व्यक्ती, स्थल, काल सापेक्ष अशी संकल्पना आहे. मुळात मन हीच एक अमूर्त संकल्पना असल्याने मानसिक आरोग्य आणि मनस्वास्थ्य ही थोडी गुंतागुंतीची संकल्पना वाटू शकते.
मानसशास्त्र विषयात मनस्वास्थ्य या संकल्पनेचा सखोल विचार आणि अभ्यास केला गेला आहे आणि अजूनही त्यावर संशोधन सुरू आहे. दुर्दैवाने सुरुवातीला मानसशास्त्र म्हणजे ‘वेड्या’ लोकांसाठीची शास्त्रशाखा अथवा केवळ मनोविकारांचा अभ्यास करणारी शाखा असा अतिशय मर्यादित विचार केला जात असे परंतु मनोविकार असणाऱ्या व्यक्ती ह्या तसं पाहायला गेलं तर समाजाचा एक छोटा हिस्सा आहेत आणि त्यांच्या उपचार व पुनर्वसनासाठी बर्यापैकी काम चालू आहे.
इथे काही प्रश्न उपस्थित करावेसे वाटतात: ज्यांना कोणताही मानसिक आजार नाही अशा व्यक्ती १००% मानसिक स्वास्थ्य अनुभवतात का?
केवळ मनोविकार नसणे म्हणजे मनस्वास्थ्य असणे का?मनस्वास्थ्याचा अर्थ आपल्याला उलगडला आहे का?
मानसशास्त्रीय संशोधक कॅरोल रिफ आणि सिंगर यांनी १९९८ मध्ये असे म्हटले होते की मानसशास्त्र म्हणजे मोडून पडलेल्या लोकांसाठी चे ‘रिपेअर शॉप’ यापेक्षा बरेच काही असले पाहिजे. त्याच दरम्यान सी एल एम कीज या संशोधकाने ही मानसिक आरोग्याबद्दल दोन महत्त्वाच्या संकल्पना मांडल्या. त्या म्हणजे फ्लरिशिंग म्हणजेच संपूर्ण मनोविकास आणि लँगविशिंग म्हणजे मानसिक र्हास.
कीज यांच्यामते मनोविकास आणि मानसिक र्हास या मानसिक आरोग्याच्या दोन मिती आहेत. या दोन टप्प्यांच्या मध्ये मानवी मनाचा प्रवास सुरू राहतो. मात्र सतत मानसिक र्हासाच्या टप्प्यावर राहिल्यास त्याची परिणिती नैराश्य, चिंता विकृती किंवा तत्सम मानसिक आजारात होऊ शकते.
ह्या सर्व संशोधकांकडून पुन्हा पुन्हा हेच अधोरेखित केले जात होते की आपल्याला कोणताही मानसिक आजार नाही याचा अर्थ आपण मानसिक दृष्ट्या सक्षम आणि उन्नत व्यक्ती आहोतच असा होत नाही. १९९९ साली झालेल्या अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. मार्टिन सेलिग्मन यांनीही हा विषय उचलून धरला. मार्टिन सेलिग्मन यांना ‘सकारात्मक मानसशास्त्राचे जनक’ म्हटले जाते. आणि साधारण दोन हजार सालाच्या सुरुवातीच्या काळास सकारात्मक मानसशास्त्र या स्वतंत्र शाखेचा उदयाचा काळ असे संबोधले जाते. सेलिग्मन यांच्यामते मानसशास्त्रीय अभ्यासाचा केंद्रबिंदू हा फक्त वाईट अथवा समस्यायुक्त मानवी वर्तन न राहता अधिकाधिक चांगले वर्तन हा ही असायला हवा. याचा पाया म्हणून सुख, आनंद, समाधान, आशावाद, व्यक्तिगत सामर्थ्य, आयुष्यातले आनंददायी अनुभव आणि आजूबाजूचं चांगलं, पोषक सामाजिक आणि वैयक्तिक वातावरण या गोष्टींचा अभ्यास व्हायला हवा. जगण्याची अधिकाधिक चांगली बाजू अधोरेखित करून चांगले जगण्याचा प्रयत्न करणे यात सकारात्मक मानसशास्त्राचे गमक दडलेले आहे.
थोडक्यात पाहायला गेले तर मानसिक स्थैर्य, मानसिक शांती, सकारात्मक भावना, भूत-वर्तमान-भविष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन, चांगली स्व-प्रतिमा, अधिकाधिक कार्यक्षमता, एकाग्रता इत्यादी गोष्टी या मनस्वाथ्याच्या दर्शक अथवा द्योतक आहेत. परंतु या गोष्टी इतर व्यक्तींपासून स्वतंत्र नसतात. व्यक्तीची जडणघडण, तसेच व्यक्तीची शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक, आर्थिक परिस्थिती, नैतिक धारणा, आजूबाजूची माणसे, वातावरण, नातेसंबंध या गोष्टी फार मोठ्या प्रमाणावर आपल्या मनस्वास्थ्यावर परिणाम करत असतात. आपले स्वतःबद्दलचे विचार कसे आहेत याचाही आपले मनस्वास्थ्य राखण्यात मोठा वाटा असतो.
सकारात्मक मानसशास्त्र या शाखेत मानवी स्वभावाच्या सकारात्मक पैलूंद्वारा मनस्वास्थ्या कडे पोहोचण्याच्या मार्गांचा अभ्यास केला जात आहे. ही एक नवी उदयोन्मुख शाखा असल्याने त्यात नवनवीन संशोधन समोर येत आहे. तसं पाहायला गेलं तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपापल्या वाट्याची आव्हानं, दुःख, आघात हे येतच असतात पण आपल्या वाट्याला आनंदाचे, सुखाचे क्षण सुद्धा येत असतात. परंतु सहज मानवी प्रवृत्ती प्रमाणे ‘सुख पाहता जवापाडे दुःख पर्वताएवढे।’ या उक्तीप्रमाणेच दुःखद अनुभवांचा बाऊ करण्याकडे आणि सुखद अनुभवांकडे दुर्लक्ष करण्याकडे आपला कल असतो. आपली दुःख गिरवण्यात आणी कधी कधी ती मिरवण्यात ही आपली खूप ऊर्जा आणि वेळ खर्ची पडतो.
सकारात्मक मानसशास्त्रात मानवी स्वभावाचा संतुलित आणि वास्तववादी दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. स्वतः तसेच इतरांबद्दल च्या वाईट प्रतिमा थोपवून चांगल्या गोष्टींकडे बघायला शिकवले जाते. मानवी सामर्थ्य, उन्नती, मनोविकास याकडे लक्ष पुरवले जाते. मानसिक सामर्थ्य ओळखणे व वाढवणे, कणखरपणा विकसित करणे आणि एकूणच मानसिक आरोग्य सुधारणे हे ध्येय सकारात्मक मानसशास्त्रात ठेवले जाते. दैनंदिन आयुष्यातले दुःख, व्यथा , दैन्य यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही किंवा तसे करणे फसवे ही ठरू शकते. परंतु सर्व नकारात्मक भावना व अनुभवांबाबत जागरूक राहून त्यांचा स्वीकार करून मानसिक सामर्थ्याच्या संवर्धनासाठी नक्कीच प्रयत्न करता येतील.
यासाठी सर्वप्रथम ‘स्व’ म्हणजे काय, स्व प्रतिमा व स्व ओळख या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे आणि स्वतःचा शोध घेतला गेला पाहिजे. मानसशास्त्रातील मानवतावादी दृष्टिकोनाचे प्रणेते अब्राहम मास्लो आणि कार्ल रॉजर्स यांनी मानवी स्वभाव मूलतः सकारात्मक आहे, प्रत्येक व्यक्ती ही एक प्रकारचे मानसिक सामर्थ्य घेऊनच जन्माला आलेली असते आणि या सामर्थ्याचे संवर्धन केल्यास याचा उपयोग मानसिक उन्नतीसाठी करता येऊ शकतो, असे सांगितले आहे, आपल्या स्वभावातील उणीवांपेक्षा आपण आपल्या मनाचा उन्नतीकडे असलेला कल याकडे अधिक लक्ष पुरविल्यास आपले आयुष्य सुसह्य , सुकर आणि सुंदर होऊ शकते. ह्या भावनेच्या जोरावर आपल्याला प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य आणि स्थैर्य राखून चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे परिस्थिती हाताळता येते. थोडक्यात काय तर आयुष्याच्या क्षणोक्षणी बदलत्या परिस्थितीमध्ये सतत जो अस्थैर्य, अस्वस्थता, असंतुलना चा अनुभव येतो त्यावर ही एक मात्रा होऊ शकते. कोरोना पॅन्डेमिक म्हणजेच covid-19 क्रायसिस मध्ये झालेल्या सर्वव्यापी मानसिक परिणामांमुळे तसेच या काळात अनेक लोकांनी स्वतःहून मृत्यूला जवळ केल्यामुळे मानसिक आरोग्याचे महत्त्व लक्षात आले आहे. त्याकडे आज अवघ्या जगाचे लक्ष वेधले गेले आहे. या आव्हानामुळे मानसिक आरोग्यावर चर्चा करण्याचे अनेक मार्ग मोकळे झाले आहेत. मनस्वास्था्याची जपणूक ही सार्वजनिक हितासाठी ही तितकीच महत्त्वाची आहे हे सर्वांना पटले आहे.
त्यामुळे वाचकहो, अशी आशा करुयात की २०२२ हे वर्ष मानसिक आरोग्याच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष देण्याचे असेल आणि ह्या वर्षात आपणही त्याबद्दल अधिकाधिक सजग होऊयात! सुरूवात करण्यासाठी आपला ‘फीलिंग थर्मामीटर ‘ अधिकाधिक positive feelings दाखवेल यासाठी प्रयत्न करू.
शुभेच्छा आणि धन्यवाद!
आदिती खरे
मानसशास्त्र अभ्यासक