Mayurpankh

वारी वारी लेह लडाख ! स्वारी स्वारी लेह लडाख !!

सर्वच जण सुट्टीमध्ये कुठ जायचं याचा विचार करीत असतात ! पण सुचत नसत. महाबळेश्वर, पाचगणी पाहून झालेलं असत अन दिवे आगरला जायचं नसत ! तस बघायला गेल तर खूप मोठा plan डोक्यात असतो तब्बल २०/२५ दिवस, काय सांगताय काय राव ! एवढे दिवस सुट्टी आणि ट्रीप ? होय मंडळी अगदी खरय नेहमीच्या रुटीनला कंटाळलोय बाबा !! एवढी सुट्टी काढायची म्हणजे धंदा-पाणी सांभाळायला हवा. किमान ८ ते १० महिने आधी प्लॅनची खिचडी शिजू लागते..

ठरलं तर मग !! अहो ठरलं ठिकाण पण कुठे ते तर विचारा ! प्लॅन ठरला लेह-लडाखचा ! लई भारी – थांबा पुढे ऐका नुसता ठरला नाही तर बाईकवर जायचा प्लॅनठरला. शिलेदार लढवय्ये असे आम्ही आठ जण एकत्र आलो. माझा आतेभाऊ स्वप्नील मुक्काम पोस्ट सांगली त्याचे इतर पाच मित्र आणि मी अन् माझा धाकटा भाऊ सुमित असे आठ जण जमलो. बाकीच्यांची नावेही तितकीच महत्वाची ती म्हणजे प्रदीप, सुनील, अभिजित, सनी , आदित्य ( सर्व सांगली ) अन् आम्ही दोघे पक्के पुणेरी !

तारीख ठरली १९ जून २०१३ – पुण्याहून प्रस्थान रेल्वेने , दिल्लीसाठी आणि २० जूनला दिल्लीला पोचून २१ ला पहाटे पुढील प्रवास बाईकवर करण्याचे ठरले. आमच्या बाईक्स १० दिवस आधीच ट्रान्सपोर्टला लोड केल्या. त्या आम्ही पोचल्याच्या तारखेला जम्मूत ताब्यात मिळाल्या. नुकतेच उत्तरांचलला पावसाचे थैमान सुरु झाले होते. त्यामुळे शंकेला जागा होतीच. पण नशीब बलवत्तर आणि आम्हाला यमुनेने रेल्वेपूल ओलांडून दिला. पाण्याची पातळी खाली गेली. आणि एका मोठ्या अडथळ्यातून पास झालो. जम्मूत दुसऱ्या दिवशी पहाटे पोहोचलो आणि आश्चर्य वाटेल एवढे टेम्परेचर वाढले होते. दिवसा ४० डिग्री सें घाम फुटला होता खुद्द जम्मूत. सगळ्यांच्या गाड्या ताब्यात घेतल्या पण तो दिवस ड्राईव्ह करायला उशीरच झाला. गाडयांची ट्रान्सपोर्टमध्ये झालेली किरकोळ तोड-फोड दुरुस्त करावी लागली. पण सगळ काही छान पार पडून आम्ही दुपारी १२.३० वा. खराखुरा थारा सुरु केला. आमचे बाईकिंग एक्सपिडीशन सुरु झाले !! सुसाट जायचे नसल्याने सगळे व्यवस्थित निघालो. पटनी टॉपला पोचलो आणि हवेतल्या गारव्याने काश्मिरची चाहूल लावली ! भारताचं नंदनवन बाईकवरून बघायला निघालोय !! त्यादिवशी श्रीनगर खूपच लांबचा पाल होता त्यामुळे बनीहालला मुक्काम केला. एव्हाना आणखी गारवा वाढला. बनीहालला हॉटेल मुक्काम करून दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे सहालाच बाहेर पडलो, बाईकला कीक मारली. अरे हो एक सांगायचं राहत होतं, साडे पाचला हॉटेल बाहेरच्या रस्त्याच्या कडेला एका टपरीवर गरमा गरम चहा मिळाला . वा ! वा ! काय बहार आली असेल ! आपण  नाहीतरी चहाला पृथ्वीवरचं अमृत म्हणतोच ते तिथे एवढ्या पहाटे मिळाले. आमच्या बॅटर्या चार्ज झाल्या अन्गियर टाकले. पुढील वाटचाल श्रीनगर. वाटेत हायवेचा सगळ्यात मोठा बोगदा जवाहर टनेल आ वासून उभा होता. आमच्या आठही गाड्या प्रचंड गर्दीतून (ट्रक्सच्या) वाट काढून कन्व्हाय मधून पास झाल्या कारण तो टनेल हा सिंगल रूट आहे. जवाहर टनेल मध्ये शिरायच्या आधी बनिहालचे नवे कोरेरेल्वेस्टेशनपहिले त्याचे उद्घाटन होणार होते. टनेल क्रॉस करून दुपारी१२ ला भारताच्या नंदनवनात श्रीनगरला पोचलो.  ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत होत्या.

श्रीनगर मध्ये वेळ काढणं शक्य नव्हतं वेळच नव्हता हातात पण दल सरोवर  वरूनच जाणार होतो म्हणून दल सरोवर उरात साठवले तेही गाडीवरूनच, आणि तडक निघालो सोनमर्गसाठी. वाटेत भूक भूक झालं मग एका ढाब्यावर पोटपूजा झाली. तिथेही परतीच्या वाटेवरचे काही वारकरी लेह- लडाखचे भेटले. त्यांच्याबरोबर गप्पा झाल्या आणि ओउधाच्या प्रवासाच्या हिंट्स मिळाल्या. खूप महत्वाचं असतं हे . तुम्ही खूप सोशल राहावं लागतं अशा ठिकाणी सगळे इगोज बाजूला ठेवायचे असतात. ‘सोनमर्ग’ लई भारी ठिकाण अखिल बॉलीवूडकर शुटींगला जातात ते . सोनमर्गला मुक्काम केला. तो ही सोनमर्ग गाव सोडून लगेच त्यामुळे आर्मीच्या गेट बंदचा त्रास झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० ला द्रास करता पुन्हा स्वार झालो. आणि पुढे गर्दीभेटणार होती. ! कसली विचारता अहो अमरनाथ यात्रेची पूर्वतयारी , बालताल हे त्या वाटेवरचे यात्रेचे महत्वाचे ठिकाण. आम्ही आता अल्टीट्युड म्हणजेचउंची गाठायला सुरुवात केली. उंचावरून अमरनाथयात्रेसाठी उभारलेले शेकडो रंगीबेरंगी तंबू ती व्हॅलीअधिकच खुलवत होते. थोडी वाटलीकाळजी पर्यावरणाची पण असो.! पण इथूनच खऱ्या अर्थाने आमच्या बाईकिंगची आणि स्टॅमिना कसोटी सुरु झाली. जोशीला पास – पहिला पास. आंम्ही पास की नापास हे तो पार केल्यावरच कळणार होते !! रस्ता खडबडीत म्हणजे ना के बराबर पहाडी रास्ता एक ही रास्ता शहारून गेलो होतो.  पण अनुभव हा अनुभव न राहता त्याची अनुभूती घेतली. जोशीला पास करून क्रॉस करून

द्रास ला पोचते झालो. द्रासची ख्याती म्हणजे जगातले दुसऱ्या क्रमांकाचे अतिथंड गाव त्याचेतापमान हे उणे ४० अंशापर्यंत उतरते. !! द्रासची दुसरी मह्त्ख्याती म्हणजे ऑपरेशन विजय” आपण पाकिस्तानच्या सैन्यावर मिळवलेला धाडसी विजय ! तिथले युद्धस्मारक बघून ऊर भरून आले.  जवानांची बलिदाने आठवून कंठ दाटून आला.  त्यांना मनोमन नमस्कार केला आणि पुढील प्रवास चालू केला. एव्हाना अल्टीट्युड बदलला तसे पर्यावरणातले बदल दिसण्यास सुरुवात झाली. हिरवाई मागे राहिली अन रखरखीत हिमालयाने आपलं रूप दाखवण्यास सुरुवात केली. कारगिल दृष्टीपथात आलं इथेच तो महासंग्राम घडला. ( प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्यानी प्राणांची बाजी लावून शत्रूला परतवून कारगील टापू जिंकून परत मिळवला. आम्ही कारगिलचे युद्धस्मारक बघितले. रोमांचित झालो. तेथील सैनिकांना शुभेच्छा देत आम्ही पुढे निघालो )

पुढे पास क्र. २ आणि क्र. ३ हे आमची परीक्षा बघणार होते. क्र. २ नामिकाला पास अंदाजे १० किमी. उत्तम डांबरी सडक अहो आश्चर्यम् ! आम्ही तो सहज पास केला. अंदाजे गाठलेली उंची बारा हजार फूट!! क्र. ३ पास फोतुला हा श्रीनगर लेह महामार्गावरील सर्वोच्च ठिकाणी पोचलो. आता लेह टप्प्यात दिसत होते. पुढील ३० किमी वर  ‘लागा थोरु’आमचे मुक्कामाचा ठिय्या. लागा थोरुला रात्री विश्रांती. दुसऱ्या दिवशी सकाळी लेहला प्रयाण केले. सकाळी ११ वा. निघालो आणि लेह १३० किमी. लागा थोरुपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लेहमध्ये पोचलो. खूप ड्राईव्हिंग झाले आणि पार थकून गेलो. लेहमध्ये मुक्काम केला. दुसरे दिवशी सकाळी लवकर आवरून मिल्ट्रीच्या इनरलाईन पर्मित्साठी सरकारी ऑफिस गाठून सगळी परमिट्स मिळाली. आमचे ‘ लेह बाईकवर’ हे स्वप्न पूर्ण झाले. आनंद आनंद अति आनंद ! दुपारी १२ वा. निघालो ‘हुंदर’साठी व्हाया खारदुंग-ला पास क्र.४ आणखी एक टफआव्हान कारण इथे आम्ही अल्टीट्युडम्हणजेच उंची गाठणार होतो १८३०० फूट !! रस्ता पुन्हा ना.के बराबर नाहीच. खडबडीत रस्ता, पुन्हा परीक्षेचा पेपर! ४० किमी अवघे, पण वेळ लागला. जगातला १ नंबर उंचीवरचा मोटार रोड . थंडीने गारठलो आणि एक लँड स्लाईड अनुभवून जगातल्या सगळ्यात उंच कॅफेटेरियात चहा प्यायलो तो ही नि:शुल्क ! आर्मीला आमचा सलाम !! इथेच आमच्यातल्या काहींना विरळ ऑक्सिजनचा त्रास झाला. त्यामुळे मनसोक्त फोटो काढून पुढे निघालो. हुंदरला मुक्कामी विसावलो. विहंगम हिमालय नजरेसमोरून जात नव्हता झोप काही येत नव्हती. हॉटेलमध्ये गरम पाण्याची सोय झाली , हात तोंड धुवून जेवून झोपलो. दुसरे दिवशी हिमालयातले शीत वाळवंट बघितले अन्दोन हंप ( डबल हम्प कॅमल ) असलेल्या उंटावरून रपेटही केली. स्वर्गीय अनुभव होता. हिमालयात वाळवंट अन् उंटसुद्धा ही कल्पनाच मजेदार पण प्रत्यक्षात अनुभवलं सगळं. परतीच्या प्रवासात खारदुंग ला पास करून पुन्हा  लेह्त आलो आणि दुसरे दिवशी सुद्धा लेह लोकल साईट सीइंग झाले ! आता आम्ही सर्व त्या हवामानाशी मिळते जुळते झालो होतो म्हणजे ‘अक्लमटाईज’ झालो होतो. लेह्मधली रो पॅलेस, लेह पॅलेस , थिकसें मॉनेस्ट्रिबघून घेतलं. लेह्त परत रात्री विश्रांती आणि पुढचा खडतर प्रवास होता तो पँगाँग त्सो ( लेक ) तब्बल १६० किमी चा टप्पा ! “चांडला” पर्यंत १० किमी खडतर नंतरपँगाँगलुकुंग पर्यंत उत्तम डांबरी सडक नव्याने बनवली होती. पँगाँग म्हणजे स्वर्ग दुसरं काही नाही त्याच्या काठावर एक रात्र मुक्काम होता !! साक्षात स्वर्गात होतो आम्ही. फोटोसाठी कॅमेरेअखंड चालू होते. आमची स्वप्नपूर्ती झाली होती. अंदाजे १२०० किमी प्रवास पूर्ण झाला आमचा आता परतीचा पुन्हा हजार किमी चा प्रवास होता.  पँगाँग लेक पाहिल्यावर थकवा कुठल्या कुठे पळाला. दुसरे दिवशी सकाळी साडे पाचला पुन्हा मोटार सायकलला कीक मारल्या.  पँगाँग लेकची कीक लई झक्कास बसली होती. तिथून पांग येथे यायचे होते. मधल्या रस्त्यात सोमोरी-रो करणार होतो पण वेळेचं गणित चुकेल असं वाटल्याने तिथे न जाता पांगला संध्याकाळी ६ल पोचलो म्हणजेच तब्बल १२ तास आम्ही जबरदस्त बाईकिंग केलं. मध्ये मध्ये फोटोसाठी थांबणं स्वाभाविकच होतं आणि अर्थात पोटपूजेसाठी सुद्धा. पांगला पोचलो त्या आधी तागलांगला पास हा असाच एक वल्ली पास पास केला. तिथून पुढे ‘मोरे प्लेन ’ नामक ४६ किमी लांबीचा सरळ रस्ता बाईकिंगची मजा आणत होता. पांगला थकून रागी टेंट मुक्काम केला. आम्माचा टेंट असाच तो ओळखला जायचा. पांगमधून दुसरे दिवशी सकाळी ६ ला निघालो.पुढे सरचू , त्या आधी एक पास ला चुलुंगला पास थोडेसे सोपे पण कच्चा रस्ता. सरचूला भूक लागली मग खादंती झाली. सरचू मधून बारा-ला-चाला पास करून  दारच्याला जेवण करून लगेचच पुढे जीस्पा के लॉंग करून रोहतांग पासला आलो. सरचू क्रॉस केल्यावर आम्ही हिमाचल मध्ये आलो पुन्हा टेरीन बदलला, वातावरण बदलले, हिरवाई दिसू लागली, सफरचंदाची फळांनी लगडलेली झाडे दिसू लागली. रोहतांग पास संपवून मनाली मुक्कामी दाखल झालो. संपूर्ण दिवसातले बाईकिंग ३१० किमी सर्व सुखरूप. मग मनालीला सेलिब्रेशन झालं. सगळं शीण, थकवा घालवला. दुसरे दिवशी मनाली साईट सीइंग करून दुपारी १२ ला निघालो. वाटेत नग्गर कॅसेल बघून पुढे कुल्लूमध्ये राफ्टींग सुद्धा केले !! तिथून मंडीला रात्री ९ ला पोचलो. हां हां म्हणता आमचे एक्सपिडीशन संपत आलं होतं. आता मात्र घराची ओढ लागली . ठरलेल्या वेळेच्या आधी २ दिवस आम्ही चंडीगडला पोचलोही.  मग पुन्हा सगळ्या बाईक्स पॅककरून ट्रान्सपोर्टला चढवल्या. एकूण किमी पूर्ण २१०० !! मग नेमकेच सामान जवळ ठेवून बाकी सगळे ट्रान्सपोर्टला लोड केले. मग अमृतसर, वाघा बॉर्डर हे दोन्ही बोनस पॉइंट्स मिळवले. अप्रतिम ट्रीप झाली आमची.

मग मात्र घराच्या ओढीने सांगली स्थित मंडळी लवकरच परतीच्या प्रवासाला लागली. आम्ही दोघंजण दिल्लीला आलो. दोन दिवस दिल्लीतील कामे संपवून अक्षरधाम मंदिर  बघून पुण्याच्या गाडीत बसलो. एसी प्रवासात पुणंकधी आलं ते कळलच नाही. आमचा पुणेस्थित मित्र विजय केळकर आम्हाला आणायला स्टेशनवर आलं होता. घरी पोचलो. घरच्यांनी हृद्य स्वागत केलं- पेढा भरवला आणि पुढच्या ट्रीपचा विचार घोळू लागला.

शब्दांकन – श्री. विजय केळकर

श्री. सुजीत ढेरे 

Email
Facebook
Twitter
Pinterest

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top