Mayurpankh

मेकअप टू मेकओव्हर

मेकअप हा प्रत्येक स्त्रीला हवाहवासा वाटत असतो. घरात एखादं फंक्शन, सण, समारंभ असेल तर सगळ्या ताई , काकू एवढचं काय तर आता आजींनादेखील मेकअप हा लागतोच. जणू काही स्त्री आणि मेकअप हे एक समीकरणच झाले आहे म्हणा ना..!

 फार पूर्वीपासून स्त्रियांना सौंदर्याची ओढ होती आणि आजही आहे पण सध्या ही ओढ वाढत आहे ती ब्युटी पार्लरमध्ये..

 मेकअपच्या साहाय्याने, एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यातील वैशिष्ट्ये जर आपण योग्य पद्धतीने दाखवू शकलो तसेच काही दोषही लपवू शकलो तर खरंच त्या व्यक्तीच्या सौंदर्यात चमत्कार घडू शकतो. नाटक, सिनेमाच्या क्षेत्रात तर मेकअप हा इतका वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे की मेकअपमुळे एखादे पात्र खूप नावाजले जाते.

मेकअपच्या साहाय्याने सौंदर्य खुलवण्याचा अनेकजणींचा प्रयत्न असतो. इतर कोणतीही फॅशन असो मेकअप हा प्रत्येकवेळी लागतोच. कारण मेकअपमध्ये आपण करु ती फॅशन असते. बाकीच्या ठिकाणी आपल्याला चालू असलेले ट्रेंडच फॉलो करावे लागतात. आजकाल मेकअप हा जगातील बहुतेकजणींच्या जीवनातील अविभाज्य घटक झाला आहे. शहरामध्ये खासकरून कामाला जाणाऱ्या महिलांमध्ये मेकअप ही एक गरज बनली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे, वातावरणातील बदलांमुळे, वाढत्या ताणतणावांमुळे एकीकडे उपजत सौंदर्य टिकवण्याची गरज वाढत असल्याचे दिसत असले, तरी पण त्यासाठी प्रत्येकवेळेस पार्लरमध्ये जाणं जमत नाही आणि घरीच पटकन मेकअप कसा करायचा याचं ज्ञान प्रत्येक स्त्रीला असतंच असंही नाही. म्हणुनच घरच्या घरी प्रत्येकीला करता येईल असा हा makeup to makeover you…

सर्वात आधी मेकअप करण्यासाठी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. त्यानंतर त्वचेनुसार टोनर, मग मॉइश्चरायझर सर्वत्र सारखं पसरेल अशा पद्धतीनं लावून घ्यावे. यामुळे त्वचा कोरडी दिसणार नाही, नंतर फाउंडेशनचा बेस तयार करून घ्यावा. चेहऱ्यावर डाग किंवा खड्डे असतील तर त्यांनी फाउंडेशन लावण्यासाठी कन्सीलर लावावं. सर्व प्रकारच्या त्वचेला सूट होणारं क्रीम स्वरुपातलं कन्सिलर बाजारात मिळतं. यानंतर डोळ्यांचा मेकअप करावा. यानंतर आयशॅडो लावावा. डोळे मिटल्यानंतर भुवयांच्या खालच्या जागेत आयशॅडो लावतात. मॅचिंग किंवा दोन रंगात आयशॅडो लावण्याची फॅशन आहे. आधी आयशॅडो लावून मग आय-लायनर लावावं, भुवया खूप फिकट असतील, तर आयब्रो पेन्सिलनं त्या थोड्या गडद कराव्यात. नंतर मस्करा आणि मग ब्लशर लावावा. डोळ्यांना अनुसरून काजळ लावावं. डोळ्यांचा मेकअप झाल्यावर लिपस्टीक लावावी. लिपस्टीक लावताना आउटलाइन करून घ्यावी आणि मग त्यात लिपस्टीक लावावी. त्यानंतर लिपग्लॉस लावावा. सर्वात शेवटी कॉम्पॅक्ट किंवा ट्रान्सलुझन्ट पावडर लावावी.

 मेकअप झाल्यानंतर रात्री झोपताना तो व्यवस्थित उतरवणे देखील जरुरी असते. तो काढताना सावकाशपणे उतरविला पाहिजे. त्याला ‘क्लींजिंग’ असे म्हटले जाते. काम करत असताना आपल्या चेहर्‍यावर घाम व तेलकटपणा येत असतो व तो घाम आपल्या त्वचेत मुरतो. मेकअप काढण्यात हलगर्जीपणा केला तर त्वचेला एलर्जी होण्याची शक्यता असते. म्हणून रात्री मेकअप व्यवस्थित काढून शांत झोप घेतली तर दुसर्‍या दिवशी आपल्याला फ्रेश वाटते. परंतु, काहीजणींना मेकअप काढता येत नाही. त्यांच्यासाठी मेकअप काढण्याची एक सोपी पध्दत आहे. ही पद्धत खाली दिली आहे:

१) सगळ्यात आधी डोळ्‍यांचा मेकअप काढावा.

२) डोळ्याच्या पापणीच्या वरच्या बाजूला लावलेला मस्कारा काढण्यासाठी आय-क्लींजिंग लोशन कापसाच्या बोळ्यावर घेऊन मस्कारा काढावा.

३) आय लाइनर व आय शॅडो घालवण्यासाठी कापूस घेऊन आय मेकअप रिमूव्हरचा वापर करावा.

४) फेस क्लींजिंग क्रीम हातावर घेऊन नाक, गाल, कपाळ व कानावर लावून मसाज करावा. त्यानंतर मानेवर मसाज करून झाल्यानंतर पेपर नॅपकीनने चेहर्‍यावर लावलेले क्रिम हलक्या हाताने काढावे.

५) मेकअप काढल्यानंतर परत एकदा कोमट पाण्याने किंवा साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.

६) जेव्हा स्किन क्लींजिंग करायचे असेल तेव्हा टोनिंग व मॉइश्चराइजिंगही करावे. त्वचा कोरडी झाली असेल तर नरीशिंग करायला विसरू नये.

सुंदर दिसायला सगळ्यांना आवडतंच पण त्यासाठी फक्त मेकअप हाच उपाय नाही याचीही जाणीव हल्लीच्या मुलीं-स्त्रियांमध्ये दिसत असून त्याप्रमाणे बहुतेकजणी पौष्टिक पदार्थ, फळं, भाज्यांचाही समावेश आहारात करतात. यामुळे शरीरही निरोगी राहतं आणि त्वचाही उजळते.

Email
Facebook
Twitter
Pinterest

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top