भारतीय सजावटीला स्वतःची एक वेगळीच शैली आहे. या शैलीचे अनेक पाश्चिमात्य देशांनी अनुकरणसुद्धा केलेले आहे. १० वर्षांपूर्वी गृहसजावट करणे म्हणजे वास्तूविशारदाला मिळणारा जॉबचा एक भाग होता. एखादा वेगळा सजावटकार घेऊन आपले घर सजविणे हे भारतात प्रचलित नव्हते. पण झपाट्याने वाढत जाणारा मध्यमवर्गीय समाज आणि त्यांचा “एका परिपूर्ण अपार्टमेंटचा’’ शोध यांमुळे इंटीरीअर डीझाईनर व्यावसायिकांची मागणी खूपच वाढली. भारतीय गृहसजावटीमध्ये आपल्याला भरपूर विविधता बघायला मिळते. वेगवेगळ्या प्रदेशानुसार एक अद्वितीय कला अनुभवायला मिळते. ही कला तेथील स्थानिक कारागिरांवर अवलंबून असते. भारतीय अंतर्गत गृहसजावटीला, पारंपारिक वास्तुशास्त्राने नेहमीच प्रेरणा दिली, ती परंपरा मुघल आणि रजपूत पद्धतींना अनुसुरून होती.
घराचा एखादा कोपरा, कमान आणि उंच झरोका हे बहुतेक घरांचे अविभाज्य अंग आहेत. खूप लोक सुरेखपणे कोरलेले फर्निचर घेणे अधिक पसंत करतात. झरोका हीसुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट कित्येकदा बऱ्याच घरात पाहायला मिळते. झरोका हा पारंपारिकपणे मुघलांचे वैशिष्ट्य होते पण तो अनेकदा रजपूतांच्या घरातही बघायला मिळायचा. झरोके हे अत्यंत बारकाईने कोरलेले आणि खिडक्यांजवळ डिझाईन केलेले असतात. काही झरोक्यांवर जाळीसुद्धा कोरलेली असते.
विविध रंगसंगती:भारतीय लोक नेहमी अनेक रंगसंगती अधिक पसंत करतात. युरोपिअन सजावटीच्या शैलीचा विरोधाभास त्यांच्या या नवीन कलेत दिसून येते. हिरवा, नारिंगी आणि लाल रंग भारतीय लोक अधिक पसंत करतात. जरी त्यांनी वॉलपेपर लावले तरीसुद्धा त्यात मोरांसारखी पारंपारिक चिन्हे तसेच मूळची अरेबिअन आणि पर्सीअन रूपचिन्हे ते पसंत करतात. भारतीय सजावटीत नाजूकपणे कोरलेले फर्निचरसुद्धा बघायला मिळते.
हल्ली सजावटीत अजून एक मोठा कल दिसून येतो तो म्हणजे टेक्शर करणे. टेक्शर कुठेही वापरले जाऊ शकते.भिंती, जमिन आणि कपड्यांवरसुद्धा टेक्शर करता येते. कशिदा किंवा भरतकामासारख कामसुद्धा खूप लोकं पसंत करतात. सुशोभित आणि भरतकाम केलेले फर्निचर पण छान वाटते. मशीनवर विणलेल्या कपड्यांपेक्षा नैसर्गिकपणे विणलेले कपडे जास्त पसंत केले जातात.
खूप सारे भारतीय लोक घर सजवण्यासाठी मातीची भांडी वापरतात. पेंटिंग आणि भारतीय देव-देवतांच्या मुर्तीनासुद्धा घरांमध्ये महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. भरपूर खिडक्या असलेली हवेशीर आणि प्रकाश येणारी घरे लोक पसंत करतात. घरात लावलेली झाडेही भारतीयांना आवडतात. भरपूर लोक वास्तूशास्त्रेच्या कलेनुसार किंवा कला आणि शास्त्रानुसार बांधकाम करतात. वास्तूशास्त्र हे मंदिर बांधण्याच्या कल्पनेशी संबंधित आहे. पण या आश्चर्यजनक शास्त्राला लोकांच्या घरापर्यंत जाण्याचा मार्ग मिळाला आणि खूप लोकप्रियतासुद्धा मिळाली.
वास्तू ही मुख्यतः बांधकामाची कला निसर्गाच्या ५ तत्त्वांनुसार चालते. ही तत्त्वे म्हणजे:
पृथ्वी : आपण जे सर्वकाही बांधकाम करतो त्याचे वजन ही पृथ्वी सांभाळते. पृथ्वीला चुंबकीय गाभाही असतो.
आग : यामध्ये दिवसा आणि रात्रीची सौरऊर्जासुद्धा येते. उष्णता आणि कॉस्मिक ऊर्जाही आग या तत्त्वातच मोडतात.
आकाश : भव्यता आणि पूर्ण पसरलेले आकाश जे इतर सगळ्या ऊर्जा सामावून घेते. ते सगळ्या ऊर्जा पारेषीत करते.
जल : यामध्ये पाऊस,वादळ,गारा,बर्फ यांचा समावेश होतो. यामध्ये मुख्यतः नदी आणि समुद्राची कॉस्मिक शक्तीही समाविष्ट आहे.
हवा : पाच तत्त्वांपेक्षा सर्वात शक्तिशाली तत्त्व आहे. हवेमुळे आपले जीवन सुसह्य होते.
भारतीय वास्तुशास्त्र हे फार पूर्वीपासून म्हणजे देवादिकांच्या काळापासून चालत आलेले शास्त्र असून हल्ली त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. संपूर्ण जगातील लोकांनी आता वास्तूशास्त्राची किंवा भारतीय घर बांधण्याच्या पद्धतीची खुबी ओळखून त्याचा स्वीकार केला आहे. भारतीय डिझाईनसुद्धा संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात स्वीकारले जात आहे.