Mayurpankh

कास … एक निसर्गदत्त देणगी

निसर्ग … इथे सतत जुने जाऊन काहीतरी नवीन जन्म घेत असते. निस्वार्थीपणे दुसऱ्याला फक्त देणे हा विशेष गुण लाभलेला निसर्ग विविध रंग-रुपाची उधळण करत असतो. ऋतूनुसार बदलणारी त्याची नवलाई अवर्णनीय असते. प्रत्येक ऋतूच्या आगमनाची चाहूल व रूप विलोभनीय… म्हणूनच कवींनी ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे’ असे वर्णन केले आहे . जसं शरदाचे चांदणे मोहक वाटते तसंच वर्षा ऋतूतील  निसर्गाचे रूपही हवेहवेसे वाटते. वर्षा ऋतूत हिरवाईची दुलई पांघरलेला निसर्ग काही ठराविक ठिकाणीच रंगीबेरंगी फुलांच्या माध्यमातून सौंदर्याचा वर्षाव करत असतो. असेच विविधरंगी फुलांनी बहरणारे ठिकाण म्हणजे सातारा जिल्ह्यातील कास पठार… यवतेश्वरचा घाट ओलांडत कास तलावाच्या वाटेवर समुद्र सपाटीपासून १२४० मी. उंचीवर दुरवर पसरलेले जांभ्या दगडांच सच्छिद्र पठार. म्हणजेच कासचे पठार…

चहूबाजूंनी सह्याद्रीच्या रांगांनी वेढलेले एरवी रुक्ष असे हे पठार पावसाळ्यात मात्र जिवंत होते आणि विविध फुलांच्या रूपाने जणू स्वर्गच अवतरतो. ऑगस्ट – सप्टेंबरच्या काळात या रानफुलांचा अक्षरश: सोहळाच चालू असतो. आगळ्यावेगळ्या भौगोलिक संरचनेमुळे या पठारावर ज्या वनस्पती उगवतात त्यांचे जीवनचक्र जेमतेम महिनाभर, त्यामुळे दर पंधरवड्याला हे पठार रंग बदलताना दिसते. हे पठार म्हणजे अत्यंत दुर्मिळ व जगाच्या पाठीवर कुठेच न आढळणाऱ्या वनस्पतींचे एकमेव आश्रयस्थान. नागमोडी घाट संपताच डोळ्यात भरतात ते रस्त्याच्या दुतर्फा दूरवर पसरलेले निळे, पिवळे, गुलाबी, पांढरे फुलांचे गालिचे, विधात्याने नाना रंगांचे घटच्या घटच जणू फुलांवर रीते केले आहेत. दोन तुऱ्याची दलदलीत उगवणारी ‘वायतुरा’ व ‘कंदीलपुष्प’ हे तर ‘कास’ चे  ‘खास’ आकर्षण. याचबरोबर सीतेची असवं, पिवळी सोनकी, तेरडा, मिकीमाउस, महाळूंगी अशा अनेक दुर्मिळ जातींच्या फुलांचे ताटवेच्या ताटवे बहरतात. हबे अमरी सारखे पांढऱ्या शुभ्र फुलांचे ऑर्किड ही ह्यात मागे नाहीत. पावसामुळे साचलेल्या छोट्या छोटया तळ्यांच्या आसपास गेंद आणि जांभळी मंजिरी बहराला येते. हे गेंद म्हणजे अक्षरश: टपोरे मोतीच !

या फुलांचा थाटही बघण्यासारखा असतो. खोडकर हसणारी स्मिथियाची (मिकीमाउस) ची फुले, खाली मुंडी घातलेले कीटकभक्षी सीतेची आसवे (युट्रीक्युलारीया), ताठ उभे राहून ऐटीत डोलणारी शेपूट अमरी, काही कीटकांची नक्कल करणारी ऑर्किड्स, टूथब्रश सारखी दिसणारी अमरी, आकाशाकडे टक लावून  डोलणारी जांभळी मंजिरी, हात जोडून नमस्कार करणारे कंदीलपुष्प, सापासारखा फणा काढलेली सापकांदा, गुच्छात येणारे पिंडा एक ना अनेक प्रकार डोळ्यांचे पारणे फेडतात. सूर्योदयी उमलणारी, रात्री उमलणारी, काही मिनिटांचेच आयुष्य असणारी, सात वर्षांनी फुलणारी अशा नानाविध फुलांचे ताटवे आपल्याला वेगळ्याच सृष्टीत घेऊन जातात.

कास ६ कास ३कास ७कास ८कास ४कास ५kaas 2

या अभिजात निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत असतानाच क्षणात धुके, बोचरा वारा, भुरूभुरू पाउस , क्षणार्धात उन आणि यामुळे उमटलेली इंद्रधनुष्याची हलकीशी छटा असा अविष्कार अनुभवताना कवितेच्या ओळी आठवतात

‘क्षणात येते सरसर शिरवे

क्षणात फिरुनी उन पडे’

या पठाराची आगळीवेगळी भौगोलिक संरचना, पश्चिम घाटातील अत्यंत दुर्मिळ अशा सुमारे ८५० पुष्प वनस्पतींचा अधिवास यामुळे जागतिक वारसा स्थळ असं शिरपेच ही आता खोवला गेला आहे. सहाजिकच पर्यटक, अभ्यासक, पर्यावरणप्रेमी , फोटोग्राफर्स यांचा ओढा वाढत आहे. निसर्गाच्या ओढीपेक्षा मौजमजा करणाऱ्या पर्यटकांची गर्दीही वाढत आहे, मग प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टने यांचा कचरा ओघाने आलाच. नाजूक, रंगीबेरंगी फुलांचे गालिचे पाहून अनेकांना त्यावर लोळण घ्यायचा मोह आवरत नाही, काहीजण हव्यासापोटी ही फुले मुळासकट उपटूनही काढताना दिसतात. आपल्या स्वार्थापायी आपण या फुलांचे अस्तित्व धोक्यात आणत आहोत याची जाणीवच दिसून येत नाही. असेच चालू राहिले तर ही निसर्गदत्त देणगी आपण गमावून बसू. तेव्हा या आभासी स्वर्गाची अनुभूती नक्कीच घ्या पण या दुर्मिळ वनस्पतींच्या संवेदनशील अस्तित्वाचे भान ठेवूनच !

– मृदूल कशेळकर

Email
Facebook
Twitter
Pinterest

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top