जगभरातल्या लोकांना जर दोन गटात विभागायचं असेल तर अगदी सोप्पं झालंय. एक गट एफबी वर असणाऱ्यांचा आणि दुसरा एफबी वर नसणाऱ्यांचा. एफबी वर असणं हे टाईमपास म्हणून न राहता आता प्रतिष्ठेच लक्षण झालं आहे. एफबी वर असणारे नॉन फेसबुक वाल्यांकडे अत्यंत क्षुद्र जीव म्हणून बघतात. “एफबी शिवाय जाईना !” हा स्वाती केतकर यांचा लेख वाचला आणि अनेक प्रश्न मनात उभे राहिले.
या लेखात मटा तर्फे मुलींमध्ये फेसबुक बद्दल घेतलेल्या सर्व्हेची आकडेवारी, अनेक मुलींची मते व त्यावरील निरीक्षण मांडलं होतं. मला वाटतं हा सर्व्हे १७-२४ वयोगटातील मुलींमध्ये घेतला असावा. यातील आकडेवारी सांगते की एफबी वापरणाऱ्या मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. मुलीदेखील मुलांएवढ्याच टेक्नोसॅव्ही झाल्या आहेत. अत्यंत आनंदाची बाब आहे. इंटरनेट आणि सोशल मेडिया आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक झाला आहे. टीनएजर्समध्ये याचं प्रमाण अत्यंत जास्त म्हणजे जवळ जवळ ९३% एवढं आहे. नुकताच संडे टाईम्सने या शतकात जन्मलेल्या आणि टीनएजर्स असलेल्या मुलांचा सर्वे घेतला. यातली आकडेवारी डोळे उघडवणारी आहे. ५०% मुलांना ४-७ या वयातच इंटरनेट आणि त्याच्या वापराची माहिती झाली होती. ३७% मुले आपला मोकळा वेळ इंटरनेट सर्फिंग मध्ये वापरतात.
सोशल मिडियावर सभासद होण्याचं साधारण वय १३ वर्ष आहे. पण १३ वर्षाखालील लाखो मुलं आज सभासद आहेत. त्यांनी मान्य केलंय की आम्ही खोटं वय दाखवून सभासद झालो आहोत. त्यांना माहित आहे की आपण खोटी माहिती देऊन सभासद होत आहोत तरीही त्याचं प्रचंड आकर्षण आहे.
ही सगळी धडपड कशासाठी? तर माझ्या ग्रुपमध्ये मी मागे पडू नये म्हणून २४ X ७ सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहावं यासाठी प्रयत्न. माझ्या आयुष्यातली लहानांत लहान घटना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग जाणून घेण्यासाठीचा आटापिटा. सोशल नेटवर्किंग साईट्स (एसएनएस ) वर सभासद होण्याची खूप कारण आहेत. त्यापैकी सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं मघाशी सांगितलेलं. माझे मित्र मैत्रिणी आहेत म्हणून मी ! मुळातच या पिढीचा आणि तंत्रज्ञानाचा खूप जवळचा संबंध आहे. संडे टाईम्सच्या सर्वे नुसार मोबाईलची माहिती १५ % मुलांना ४ वर्षापेक्षा कमी वयात झाली. ६५ % मुलांना ४-७ वर्षात मोबाईल माहित झालाहोता. थोडक्यात अत्यंत लहान वयात ही मुलं टेक्नोसॅव्हीझाली आहेत. तंत्रज्ञानाबद्दल आणि त्यात होणाऱ्या बदलांबद्दल प्रचंड आकर्षण आहे. या आकर्षणाचे रुपांतर Obession मध्ये होण्यास वेळ लागत नाही.
सोशल नेटवर्किंगमुळे अगदी सहज आणि तत्काळ मित्रांशी, नातेवाईकांशी संपर्क साधता येतो. त्यासाठी फारसे श्रम घ्यावे लागत नाहीत. हे देखील सोशल नेटवर्किंगच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण आहे. एकंदरीतच या आभासमय जगाबद्दल प्रचंड उत्सुकता या पिढीत जाणवते. इंटरनेट आणि सोशल नेट्वर्किंग एवढं आकर्षक आहे की त्याच्या प्रेमात सगळ्याच वयोगटातील लोक आहेत. गॅझेट्सआणि इन्टरनेटला तेवढाच आकर्षक पर्याय उपलब्ध नसणं हे देखील त्या मागचं महत्वाचं कारण आहे. सगळ्याच गोष्टींचं डिजिटलाईजेशन झाल्याबद्दल क्रिएटिव्हीटीपण डिजिटल झाली आहे. प्रत्येक गोष्टीचा लगेच येणारा कंटाळा देखील इंटरनेटकडे ओढला जाण्याचे कारण आहे.
इंटरनेट शिवायच्या जगात आपली दाखल जगाला घ्यायला लावण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागायचे. आज त्या मानाने खूप सोपे झाले आहे. क्षणार्धात लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची ताकद या माध्यमाने दिली आहे. अक्षरश: शेकडो संधी उपलब्ध आहेत. संभाषण साधणं, विचार मांडण, लोकांशी जोडलं जाणं अगदी सोप्पं झालंय. प्रत्येक गोष्ट अगदी instant झाली आहे. त्यामुळेच instant मिळणाऱ्या सुखासाठी देखील कितीतरीजण SNS वर सभासद होत आहेत.
इंटरनेट आणि सोशल नेट्वर्किंग च्या वापराचे परिणाम देखील तेवढेच दूरगामी आहेत. SNS मुले कितीतरी लोकांना आपले विचार मांडायला हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. आपली मतं हजारो लोकांपर्यंत पोहोचवणे आता एका क्लिकवरशक्य झालं आहे. कितीतरीजण आपले राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विचार मांडण्यासाठी या व्यासपीठाचा वापर करत आहेत. अनेक राजकीय नेते, धार्मिक गुरु, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचण्यासाठी या माध्यमाचा वपर करताना दिसत आहेत. मुलांप्रमाणे मुलींनादेखील हक्काचा कट्टा मिळाला आहे. मनमोकळे एकमेकांशी संवाद साधण्याची जागा असं प्रचार झाल्यामुळेच एसएनएस एवढ्या कमी कालावधीत लोकप्रिय झाले आहेत. आधी ऑर्कुट आणि आता फेसबुक म्हणजे अनेकांचा जीव की प्राण आहे.
सर्वसामन्यांप्रमाणे अनेक कंपन्यांनी सुद्धा एसएनएस चा वापर मोठ्या प्रमाणात सुरु केला आहे. आपल्या ब्रँडला प्रमोट करण्याचा हा अत्यंत स्वस्त आणि सोपा मार्ग आहे. प्रत्येक प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक जाहिरातीत Follow us on Facebook and Twitter चे लोगो झळकू लागले आहेत. अण्णा हजारेंची भ्रष्टाचार विरोधी चळवळ फोफावण्यामागे या सोशल नेट्वर्किंगचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. प्रस्थापितांच्या ( systemच्या) विरोधात मते मांडण, टीका करणं हे सगळं तरुणांच्या मते बंडखोरपणा असल्यामुळे असे तरुणांचे गट एसएनएस वर फूल अॅक्टीव्ह दिसतात.
या सकारात्मक परिणामांबरोबर अनेक नकारात्मक परिणाम देखील आता तितक्याच प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. तंत्रज्ञानावर भाळण्याची वेळ संपून आता सहवास सुरु झाला आहे. मोबाईल, टीव्ही आणि कॉम्प्यूटरच्या स्क्रिनला चिकटून बसलेली ही मुलं दिवसेंदिवस समाजापासून दूर जाताना दिसत आहेत. एका विशिष्ट वयात आई वडिलांबरोबर कार्यक्रमाला सहलीला जायचं मुलं टाळत असतात आणि मित्रांबरोबर जाणं निवडतात. आता मित्रांची जागा गॅझेट्सने घेतली आहे.
संवाद हळूउहळू कमी होऊन त्याची जागा chat, Like आणि share नी घेतली आहे. मुळातच न्युक्लिअर फॅमिली त्यात आई-बाबा लॅपटॉप, आयपॉड किंवा बीबीएम वर मग मुलं एफबीवर. मला वाटतं, लवकरंच, ‘ताट वाढलंय जेवायला या ’ असं मेसेज घरातल्या सगळ्यांना येणार आहे. परस्पर संवाद , एकत्र बसून चर्चा या सुदृढ नातेसंबंधासाठी अतिशय आवश्यक आहेत. त्याचं मुळात कमी होत आहेत.
संवादाची कमतरता आणि सतत गॅझेट्सवर अवलंबून राहण्यामुळे आपण सगळे या LFT ( Low Frustration Tolerance ) विकाराला बळी पडत आहोत. प्रत्येक गोष्ट फास्ट आणि बोटाच्या टोकावर हवी असते. जरा जरी मनाविरुद्ध झालं की चिडचिड होते. आणि हे सगळीकडेच जाणवतं. सहनशीलता, संयम नावाचा प्रकार संपुष्टात आलाय की काय असं वाटतं. रस्त्यात जरा जरी एखादं वाहन थांबलं की हॉर्न जोरजोरात सुरु होतात. कॉम्प्यूटर slow नाहीतर Hang झाला की त्रागा सुरु, सगळ्यांची घाई आणि चिडचिड.
खऱ्या जगापेक्षा इंटरनेटच्या आभासी जगात जगणं अनेकांना आवडायला लागलंय आणि हे अत्यंत भीतीदायक आहे. Real v/s Virtual चे व्दंव्द प्रत्येक मनात सुरु आहे. खऱ्या जगातल्यापेक्षा या आभासी जगात असणं अधिक सोपं असल्यामुळे अनेकांचा ओढा आभासी जगाकडे आहे. स्वत:च्या कल्पनेतली प्रतिमा इंटरनेटवर रंगवण्यात अनेकजण मशगुल असतात. माझा एफबीवरचा फोटो चांगलाच असला पाहिजे यासाठी प्रचंड धडपड सुरु असते. एफबी साठी फोटो काढले जातात आणि लगेच अपलोड देखील होतात आणि मग त्याच्यावर येणाऱ्या Likes आणि Comments वर पॉप्युलॅरीटी ठरते.
ज्यांच्यात स्वत:वरचा विश्वास मुळातच कमी असतो अशी मुलं-मुली मग स्वत:चे फोटो एफबीवर टाकणं टाळतात. इतरांच्या वाढणाऱ्या फ्रेंडलिस्टकडे बघून कोशात शिरतात. एवढया प्रचंड समुदायात असून सुद्धा ही मुलं एकटी आणि दयनीय वाटतात.
दुसरीकडे आत्ममग्नता इतकी टोकाला पोहोचलेली दिसते की सतत स्वत:चं कौतुक व्हावं किंवा सहानुभूती मिळावी म्हणून लहानांत लहान गोष्टसुद्धा अगदी मोठ्ठी करून मंडळी जाते. हल्ली असं म्हणतात की स्वत:च्या मुलांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर Profileच्या wall वरचे post चेक करा. मुलाला आलेल्या तापाची बातमी आईवडिलांच्या आधी एफबी फ्रेंड्सन कळते. मग Tc Get well soon चे comments सुरु होतात. मटानी घेतलेल्या सर्व्हेत ९९% मुली म्हणतात की आम्ही फेसबुकवरील स्टेटस, फोटो, कमेंट पालकांशी शेअर करत नाही. हे अत्यंत धक्कादायक आहे. अनेक मुलं दोन अकाऊन्ट्स उघडतात एक घरच्यांसाठी आणि दुसरे मित्रांसाठी. एखादी गोष्ट तुम्हाला का लापावावीशी वाटते? कारण ती योग्य नाही याची तुम्हाला खात्री असते किंवा त्याची योग्यता पटवून देणं कठीण वाटते.
सायबर बुकिंग चं प्रमाण देखील प्रचंड वेगाने वाढताना दिसत आहे. इन्टरनेटवरचं हे रॅगिंग अजूनच भयंकर आहे कारण अगदी शेवटच्या थराला पोहचल्यावर ते पालकांना कळतं असं अनेक घटनांमधून पुढे आलं आहे. मुलं अगदी नैराश्याच्या गर्तेत ओढली जाईपर्यंत पालकांना कळत नाही. कारण संवाद नसणं आणि ज्या माध्यमात म्हणजे इंटरनेट किंवा एसएनएस वर हे होतं त्या बद्दलच्या ज्ञानाची पालकांमध्ये असलेली उणीव.
इंटरनेटवर किंवा गेमिंग झोनमध्ये खेळले जाणारे ९०% गेम हे अतिशय व्हायलंट (हिंसक) असतात. त्यामुळे मुलांमध्ये आक्रमकता आणि हिंस्त्रपणा वाढीस लागतो असे अनेक सर्व्हेमधून सिद्ध झाले आहे. एकंदरीतच कायद्याची जाणीव नसणे, अनावश्यक धोके पत्करण्याचे वाढते प्रमाण यामुळे अजाणतेपणी १८ वर्षाखालील मुलांकडून सायबर गुन्हे घडण्याचे प्रमाण खूप मोठे आहे.
मागील वर्षी सन २०१०-२०११ आणि यावर्षी सन २०११-२०१२ यावर्षी सायबर क्राईम सेलकडे नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या संख्येत प्रचंड फरक आहे. सायबर क्राईमची संख्या दरवर्षी साधारण २०० पटीने वाढत आहे. ( मागील वर्षी ठाणे सायबर सेल मध्ये शेवटच्या सहा महिन्यात ३७८ केसेस नोंदवल्या गेल्या यावर्षी साधारण १००-१२० केसेस प्रत्येक महिन्यात नोंदवल्या जात आहेत. ) यात सोशल नेट्वर्किंग साईट्स, फेक प्रोफाईल, सेक्शुअल हॅरॅसमेंट याच्या केसेस जवळपास ६०% च्या आसपास आहेत. यात गुंतलेल्यांचं साधारण वय १५ ते २१ च्या मध्ये आहे. ही आकडेवारी हादरवून टाकणारी आहे.
इंटरनेटचं आकर्षण आता व्यसनात बदललं आहे. माझी गॅझेट्स आणि मी या पलीकडे दुसरं जग अस्तित्वातच नाही अशी परिस्थिती आहे. इंटरनेट व गॅझेट चे व्यसन आता “ इंटरनेट युज डीझऑर्डर” या नावाने जगभरातील सायक्रिऑट्रिक मॅन्युअलमध्ये घेण्यात आले आहे. पुण्यात मुक्तांगण मध्ये इंटरनेटच्या व्यसनातून मुक्तता मिळवण्यासाठीचे केंद्र सुरु झाले आहे. तंत्रज्ञानाचे फायदे आपल्याला माहित आहेतच पण त्याचंबरोबर येणारे इतर परिणाम पण आपण लक्षात घ्यायला हवेत. म्हणजेच तंत्रज्ञान वाईट? इंटरनेट, सोशल नेट्वर्किंग साईट्स वाईट? असं ढोबळ लेबल लावून चालणार नाही. तंत्रज्ञान हवं हे नक्की. त्याची तीव्रता कमी करण्यासाठीची व्यूह रचना आत्तापासूनच करायला हवी. त्यासाठी गरज आहे “ रिस्पॉन्सिबल नेटीझम” ची.
“ रिस्पॉन्सिबल नेटीझम” ही चळवळ अहं फाउंडेशन मुंबई यांच्या पुढाकाराने व युवोन्मेव प्रतिष्ठान, सायबर क्राईम सेल ठाणे, मुंबई यांच्या सहकार्याने सुरु झाली आहे. सर्व नेटीझन्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठीचीही चळवळ आहे. एखाद्या देशासाठी जबाबदार नागरिक जसे आवश्यक असतात तसे इंटरनेटच्या या जगात जबाबदार नेटीझन्सची गरज आहे. ही चळवळ “इंटरनेट सोशल नेटवर्किंग किंवा गॅझेट्सच्या विरोधात नाही.” या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत आणि आपल्या प्रगतीची साधनं आहेत. फक्त कमतरता आहे यांचा वापर करताना घ्यायच्या काळजीची.
“आपली तरुण पिढी याच्या आहारी जात आहे.” यासारखी सरसकट विधानं करणं चुकीचं आहे. याचा अति वापर सुरु झाला आहे आणि अतिशय धोकादायक वळणावर ही
मुलं उभी आहेत हे नक्की. आता गरज आहे आपल्या सगळ्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्याची व रिस्पॉन्सिबल नेटीझन होण्याची.
रिस्पॉन्सिबल नेटीझन होण्यासाठी काय कराल?
टीनएजर्ससाठी –
1) कशावरही क्लिक करण्याच्या आधी किंवा कमेंट करायच्या आधी विचार करा.
2) अतिशय रागावला असाल, दु:खी असाल तर ऑनलाईन जाने टाळा.
3) ऑनलाईन मैत्री करताना काळजी घ्या. त्या व्यक्तीचा प्रोफाईल तपासून घ्या.
4) अनोळखी ऑनलाईन मित्रांना एकट्याने भेटणे टाळा.
5) शाळा, कॉलेज, अभ्यास, घर कंटाळवाणं किंवा कठीण वाटतंय म्हणून सोशल नेटवर्किंग हा पर्याय ठरत नाही.
6) इंटरनेट वापरत असताना जाणवणारे धोके किंवा अप्रिय घटना पालक, शिक्षकांशी चर्चा करा.
7) आपण इंटरनेटचा वापर किती वेळ करायचा यासाठी स्वत:वर बंधन असू द्या.
8) आपण इंटरनेट व गॅझेट्सचा अति वापर टाळण्यासाठी पर्यायी क्रिएटिव्ह सोशल अॅक्टीव्हिटीत स्वत:ला गुंतवा. मैदानी खेळ, छंद, वाचन, सामाजिक
उपक्रमांसाठी वेळ द्या.
9) इंटरनेटवर स्वत:ची आवश्यक तेवढीच माहिती द्या, उगाचच स्वत:ची आणि कुटुंबाची अनावश्यक माहिती देऊ नका.
10) पासवर्ड कुणाबरोबरहीशेअर करू नका. तो कठीण असू द्या व दर ३ महिन्यांनी बदला.
11) अनोळखी लोकांशी बोलताना शक्यतो मोबाईलचा वापर टाळा.
12) ब्लूटुथचा वापर नसताना बंद ठेवा.
तरुणांसाठी आणि पालकांसाठी
1) मुलांच्या कॉम्प्यूटर आणि गॅझेट्सच्या वापरावर लक्ष ठेवा आणि वेळेचे बंधन ठेवा.
2) मुलांशी संवाद साधा व त्यांना इंटरनेट व गॅझेट्सच्या जास्त वापराचे धोके समजावून सांगा.
3) १० वर्षाखालील मुलं इंटरनेटचा वापर करत असतील तेव्हा त्यांच्या सोबत असणे आवश्यक आहे.
4) मुलांना ऑनलाईन जाणवणारे धोके वा अप्रिय गोष्टी लगेच तुमच्याशी शेअर करण्यासाठी प्रोत्साहन द्या.
5) सोशल नेटवर्किंगचा योग्य वापर करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्या.
6) व्हर्चुअल जगापेक्षा खरं जग हे जास्त आकर्षक व चॅलेंजिंग आहे याची जाणीव करून द्या.
7) आपला पाल्य इंटरनेट व गॅझेट्सचा अतिरिक्त वापर करतोय आणि तुमच्या सांगण्याने तो कमी होत नसेल तर व्यावसायिक मदत घ्या.
8) तुमच्यासाठी व मुलांसाठी इंटरनेट व गॅझेट्सच्या वापरासाठी काही नियम तयार करा व ते पाळले जातील याची काळजी घ्या.
9) घरातील पी.सी. वर पॉपअप ब्लॉकर्स, फायर वॉलस आणि “नेटनॅनी” सारखे काही सॉफ्टवेअर वापरा. ज्यामुळे मुलांच्या वापरावर बंधन निर्माण होईल.
10) घरात कॉम्प्यूटर अशा ठिकाणी ठेवा जिथे मुलं वापरत असताना लक्ष ठेवता येईल.
11) ऑनलाईन गॅम्बलिंगचे धोके मुलांना समजावून सांगा.
12) मुलानावर हेरगिरी न करता संवाद साधा व त्यांना संभाव्य धोक्याची जाणीव करून द्या.
कायदेशीर मार्गदर्शक – सगळ्यांसाठी
1) कुठलाही धोका, घोटाळा किंवा अप्रिय घटना ऑनलाईन आढळली तर त्वरित पोलिसांना माहिती देणे आपली जबाबदारी आहे.
2) इंटरनेटवर आपली योग्यातीच माहिती द्यावी. दिशाभूल करणारी माहिती देणं गुन्हा आहे.
3) शिवराळ भाषा व शिव्यांचा वापर ऑनलाईन करणं हा आयटी अॅक्टनुसार गुन्हा आहे.
4) फेक अकाऊंट किंवा प्रोफाईल तयार करणं व त्याद्वारे इतरांची बदनामी करणं आयटी अॅक्ट व आयपीसी खाली गुन्हा आहे.
5) देश, धर्म, जात, ऐतिहासिक जागा, देशातील नेते यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर इंटरनेटवर टाकणे गुन्हा आहे.
6) कुठलेही बिभित्स अप्रिय फोटो अपलोड करू नका.
“रिस्पॉन्सिबल नेटीझन” होण्यासाठी लागणाऱ्या या सगळ्या गोष्टी कदाचित आपल्याला माहित असतीलच पण आता त्या आचरणात आणायची वेळ आली आहे. वाढती इंटरनेट, गॅझेट्स dependency, सायबर गुन्ह्यांच वाढतं प्रमाण या सगळ्यावर मात करण्यासाठी आपणच आपली मदत करायला हवी. कायदे जरी असले तरी पळवाटा शोधून काढल्या जातात. त्यामुळे “जबाबदारीची जाणीव” हाच त्यावर उपाय आहे.
“रिस्पॉन्सिबल नेटीझन”या चळवळी अंतर्गत आम्ही शाळा, कॉलेज कॉर्पोरेट्स, हौसिंग सोसायटीत जाऊन जागृती करत आहोत. प्रत्येक वयोगटासाठी साधारण १ तासच पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशन आहे. आतापर्यंत ठाणे, मुंबईतील साधारण १५,००० विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो असून महाराष्ट्र व देशभर पोहोचण्याचे नियोजन आहे. आय.पी.एच. व इतर मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या मदतीने हेल्पलाईन सुरु करण्याच्या प्रयत्नात आहोत.
या चळवळीचे उद्दिष्ट “इंटरनेट व गॅझेट्सच्या जबाबदार वापरा संबंधी जागृती करणे आहे.” त्याचं बरोबर सायबर सुरीक्षितेसाठी प्रयत्न करणे देखील आहे. या विषयाची सखोल माहिती देण्यासाठी www.responsiblenetism.org या नावाची वेबसाईट तयार करण्यात आली आहे. यावर या विषयातले तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या चळवळीद्वारे आपण सरकारकडे काही मागण्या करणार आहोत. त्यासाठी आपल्या पाठिंब्याची गरज आहे. वेबसाईटवर Pledge your support या सेक्शनमध्ये जाऊन आपण आपलं पाठींबा व्यक्त करू शकता.
या शैक्षणिक वर्षात २ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक पाठबळाच्या शोधात आम्ही आहोत. आपले विचार आणि आर्थिक मदत या चळवळीसाठी आवश्यक आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर सुदृढ शारीरिक व मानसिकरीत्या जुळवून घेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणं आवश्यक आहे. Be acyber safe and responsible netizen.
आमच्याशी संपर्क साधा responsiblenetism@gmail.com
– सोनाली पाटणकर