अन्न ही माणसाची मूलभूत गरज. प्रत्येक ठिकाण चे हवामान, प्रथा-परंपरा यांतील वैविध्यामुळे अनेक पदार्थ तयार झाले आणि कालांतराने या गरजेचे रुपांतर संस्कृतीत झाले. त्यातूनच जगभरात विविध खाद्यसंस्कृती निर्माण झाल्या.
भारतीय पाकविद्येला हजारो वर्षांची परंपरा, इतिहास आहे. भारतीय संस्कृतीत ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असल्याचे मानले जाते. दर कोसावर भाषा बदलते असं म्हणतात. भारतात मात्र फक्त भाषाच नाही तर खाण्या-पिण्याच्या पद्धतीही बदलत जातात. भारतीय आहारात षडरस म्हणजे गोड्,आंबट , तिखट्, कडू, खारट आणि तुरट या चवींना महत्व दिले जाते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे आहारात मसाल्यांचा मोठ्या प्रमाणावरील वापर. धने, जिरे, आले, लसून, मिरी, दालचिनी, तमालपत्र अशा अनेक मसाल्यांच्या पदार्थांचे इथे उत्पादन केले जाते, त्यामुळे साहजिकच त्यांचा वापर स्वयंपाकात विशिष्ट स्वादासाठी, रूढी वाढवण्यासाठी, पदार्थ जास्त काळ टिकवण्यासाठी सर्रास केला जातो. मसाल्यांशिवाय हिंग, कढीलिंब, ओवा, वेलची इत्यादींचा उपयोग भारतीय पाकशास्त्रात केला जातो. मसाल्यां सोबत विविध प्रकारच्या वनस्पती याही आहाराची चव वृद्धींगत करण्यासाठी वापरतात. मसालेदार आहारासोबत विविध् प्रकारच्या मिठाया व गोड पदार्थ आहाराला परिपूर्ण बनवतात.
सर्वसामान्यतः भारतीय लोक पूर्ण शाकाहारी, अर्ध शाकाहारी व पूर्ण मांसाहारी आहेत. त्या त्या आहारातील लोकांच्या आवडीचे पदार्थ नेहमीच तयार केले जातात. पूर्ण शाकाहारी लोकांच्या आहारात वनस्पतिज पदार्थांचा वापर करून योग्य ते स्वाद, मसाले वापरून केलेल्या अनेक चवदार पदार्थांचा समावेश होतो. विविध प्रकारच्या भाज्या कडधान्ये ,तांदूळ व गव्हाची पोळी अथवा चपाती किंवा बाजरीची/ज्वारीची भाकरी हे शाकाहारी जेवणात प्रामुख्याने असते. असे पदार्थ परंपरागत पाकपद्धतीने करण्यात येतात. पूर्ण शाकाहारी आहाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उपवास. व्रतवैकल्ये इ. प्रसंगी करण्यात येणारे खाद्यपदार्थ नेहमीपेक्षा वेगळे असे तयार करण्यात येतात. मासांहारी जेवणात कोंबडी व बोकडाचे मांस प्रामुख्याने खाल्ले जाते. किनाऱ्या लगतच्या प्रदेशात(कोकण केरळ व पूर्व किनारपट्टी), बंगाल,आसाम या प्रांतात मास्यांचा जेवणात समावेश असतो. किनाऱ्या लगतच्या प्रदेशात, म्हणजे कोकण, केरळ, पूर्व किनारपट्टीकडील राज्ये, बंगाल, आसाम या राज्यांत माश्यांचा जेवणात समावेश असतो.
साधारणतः भारतीय आहारात धान्ये व कडधान्ये यांचा वापर केला जातो. भुईमूग, मोहरी, तीळ इत्यादींची तेले, वनस्पती तूप, लोणी, शुद्ध तूप इ. स्निग्ध पदार्थ वापरले जातात. तसेच दूध व त्यापासून तयार केलेले दही, ताक लोणी, तूप, चक्का, खवा, पनीर इत्यादींचाही वापर करण्यात येतो. नेहमीच्या भारतीय आहारात भात, चपाती, पुरी वा भाकरी, भाज्या, आमटी, वरण, लोणचे, चटणी, कोशिंबीर, रायते, भरीत, दही, ताक यांचा समावेश होतो. आमटी, सार यांसारखे पदार्थ बनविण्यासाठी चिंच, आमसुले वापरतात, तर ख्रिस्ती, पारशी लोक त्यासाठी शिर्का (व्हिनेगर) वापरतात. काही प्रसंगी पापड, सांडगे, पापड्या, फळांचे मुरंबे, विविध लोणची, विविध चटण्या इ. आधी तयार केलेल्या पदार्थांचा समावेश केला जातो.
बहुतेक गोड पदार्थ सुशोभित दिसावेत व चवीत वाढ व्हावी म्हणून बेदाणे, पिस्ते, बदाम, काजू, वेलची, चारोळी इत्यादींचा वापर केला जातो, तर शिजविलेल्या तिखट पदार्थांवर ओले खोबरे, कोथिंबीर व तळलेल्या तिखट पदार्थात मिरच्या, तीळ, जिरे इ. पदार्थ वापरतात. भारतीय खाद्यपदार्थ स्वादिष्ट व खमंग बनविण्यासाठी फोडणी वापरली जाते. सामान्यतः भुईमुगासारख्या सहज उपलब्ध होणाऱ्या व सर्वांना परवडतील अशा प्रथिनयुक्त पदार्थांच्या कुटाचा सढळ हाताने वापर केला जातो.
भारतीय पद्धतीच्या पूर्ण आहारापासून, त्यात वापरण्यात येणाऱ्या डाळी, धान्ये, भाज्या इत्यादींमध्ये आवश्यक ती पोषणद्रव्ये सहज मिळू शकतात. तथापि खाद्यपदार्थ बनविताना वापरण्यात येणाऱ्या खरपूस भाजणे, तळणे, शिजवणे इ. कृतींमुळे त्यांतील जीवनसत्त्वे व इतर काही घटकांचा काही अंशी नाश होतो; परंतु अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांचा एकाच वेळी मिश्र वापर केल्यामुळे त्यांच्या पोषणमूल्यात फरक झालेला आढळून येत नाही. त्याचबरोबर असे पदार्थ रूची व चमचमीतपणा या बाबतींत सरस असतात.
प्रांतानुसार, भारतात आहाराच्या सवयीत वैविध्य आहे. उत्तर भारतात आहारात गव्हाच्या पदार्थांचा समावेश असतो तर दक्षिण व पूर्वेकडे आहारात तांदळाच्या पदार्थांचा जास्त वापर आहे. मध्य भारतात संमिश्र प्रकारचा आहार असतो. प्रत्येक प्रांतातील हवामान पावसाचे प्रमाण बदलत असल्याने तेथे पिकणाऱ्या फळभाज्या, फळे, कडधान्ये यात फरक पडतो त्यामुळे प्रांतवार आहारात मोठ्या प्रमाणात विविधता दिसून् येते.