आपल्या जीवनात प्रत्येक क्षणी , प्रत्येक ठिकाणी अतिशय महत्वाचा असा घटक म्हणजे सजावट. मग लग्न , पार्ट्या, कोणताही सण, समारंभ , कौटुंबिक कार्यक्रम येथील प्रत्येक गोष्टीच्या सुरेख सादरीकरणासाठी सजावट ही आलीच. मग पाककला तरी यात मागे कशी राहील? संभ्रमात पडलात ना ! अहो.. अगदी पूर्वीच्या काळीसुद्धा साधा स्वयंपाक त्याची चव त्यातील पौष्टिक घटक, रंगांपर्यंत घरातील स्त्रिया अतिशय काटेकोर असंत. कल्पना करा बरं.. ताट विविध पदार्थांनी भरलेले आहे पण त्यांची मांडणीच नीट केली नाही, ते कसेही वाढले मग ते खाताना समाधान होईल? मग भले ते कितीही चविष्ट असो. कांदेपोहे – छान, पिवळेधमक, त्यावर ओले खोबरे, कोथिंबीर आणि बाजूला एक लिंबाची फोड असे जर आपल्या समोर कोणी पेश केले तर ते नुसते बघूनच भूक चाळवते. यालाच तर म्हणतात पदार्थांची सजावट ! म्हणतात ना की पदार्थ आधी डोळ्यांनी खाल्ले जातात आणि मग प्रत्यक्ष ग्रहण केले जातात . एखादा साधा पदार्थ किती चविष्ट आहे हे खवैयांपर्यंत पोचवण्याचे काम करते ते त्याचे सुरेख, आकर्षक असे सादरीकरण. हे एक प्रकारचे ‘मार्केटिंगच’ म्हणावे लागेल. पदार्थ पाहताक्षणीच तो इतका भावला पाहिजे की समोरचा तो खाण्यास प्रवृत्त होईल. कोणाच्याही मनात शिरण्याचा मार्ग पोटातून जातो असं म्हणतात मग त्यासाठी पदार्थ चविष्ट असणे महत्वाचे असते. त्याच्या जोडीला जर आकर्षक सादरीकरण असेल तर ‘दुधात साखर’ ! ही सजावट आपल्या घरात वर्षानुवर्षे होत आली आहे. आटीव दुधाच्या बासुंदीचा बदामी रंग त्यात बदाम , पिस्ता, चारोळी टाकल्यावर खुलून दिसतो, पांढऱ्याशुभ्र खिरीवर किंवा श्रीखंडावर केशर पेरल्यास त्याचा नूरच पालटतो, लाडू वळताना लावले जाणारे बेदाणे व काजू त्याचा लुकच बदलून टाकतात, भाजीवर किंवा आमटीवर भूरभूरवलेली कोथिंबीर वेगळीच लज्जत आणते.
काळातील बदलाप्रमाणे त्यातील आकर्षकपणा वाढत गेला. विविधरंगी भाज्या आणि फळे उपलब्ध झाली आणि त्यापासून आकर्षक मांडणी करून त्याच्या सादरीकरणालाच ‘गार्निशिंग’ किंवा ‘फूड स्टायलिंग’ असे म्हंटले जाते.
ही सौंदर्यपूर्ण कला आता वेगवेगळ्या रेसिपी शोजमुळे घराघरांत पोचली आहे. टीव्हीवर एखादी रेसिपी पाहिल्यावर ती आपल्याला करावीशी वाटते ती काही उगीच नाही.
सूपवर ओढलेल्या पांढऱ्याशुभ्र क्रीमच्या किंवा दह्याच्या रेघोट्या, मिल्कशेकमध्ये घातलेले फळांच्या गराचे आईस क्युब्ज अशी कितीतरी उदाहरणे देता येतील जी पाहताच आपले टेस्ट बड्स जागृत होतात. प्रसंगानुरूप गार्निशिंगचे अविष्कार बदलत जातात. नेहमीचेच पदार्थ पाहुणे आल्यावर मात्र थोड्या वेगळ्या रीतीने सादर केले जातात. कधी स्वीट सर्व्ह करण्यासाठी कलरफुल बोल्स वापरले जातात, कधी एखादी डिश आकर्षक बनवण्यासाठी टोमेटो-गाजर-मुळा यांच्या रंगीबेरंगी फुलांनी सजवली जाते, तर कधी सलाड डेकोरेशन या सगळ्यांतून आपल्या कलेचे दर्शन करण्याबरोबरच पाहुण्यांनाही तृप्त करण्यासाठी घरातील स्त्रियांचा प्रयत्न चालू असतो. लहान मुलांना पौष्टिक, त्यांच्या नावडीचे पदार्थ खाण्यास भाग पाडण्यात तर या गार्निशिंगचा मोठा वाटा असतो. स्वीटवर लालचुटूक चेरी, प्राण्यांच्या आकारातील सँडविच किंवा कटलेट, केकवरील आकर्षक आयसिंग अशा अनेक प्रकारे आई आपल्या मुलांनी पौष्टिक पदार्थ खावेत म्हणून झटत असते. पार्टी किंवा समारंभात या डेकोरेशन ची पद्धत आणखी वेगळी असते. निरनिराळ्या शेप्सची डिझाईनची भांडी, टेबलवेअर च्या जोडीला फळांवरील नक्षीदार कार्विंग, फळे वेगवेगळ्या आकारात कापून त्यातून सर्व्ह केले जाणारे सलाड पार्टीची शोभा वाढवते. मोठमोठ्या हॉटेल्समध्ये तर फूड स्टायलिंग, गार्निशिंगचे थक्क करणारे कल्पनाविष्कार बघायला मिळतात.
गार्निशिंगमध्ये महत्वाची भूमिका बजावतात ते रंग ! त्यामुळे असे डेकोरेशन करताना रंगसंगतीचे भान ठेवावे एवढंच. हां .. आता कार्विंग सारखे स्किल आत्मसात करायचे असेल तर कौशल्याच्या जोडीला काही टूल्सची आणि ती वापरण्याच्या तंत्राचीही गरज असते. पण नुसत्या रंगांच्या किमयेनेही खवैयांना खुश करण्याचा हेतू साधता येतो. हे सारे करताना कुठलाही पदार्थ वाया जाणार नाही, वापरले जाणारे पदार्थ खाण्यायोग्य असावेत आणि आपल्या डिश ला पूरक अशीच सजावट असावी हे मात्र ध्यानात ठेवावे.