Mayurpankh

आनंददायी छंद

‘हा छंद जीवाला लावी पिसे’ अशा गाण्याच्या ओळी ऐकून खरचं छंदाबद्दल विचार करायला लागले की छंद म्हणजे नक्की काय? छंद ही खरोखरच अशी गोष्ट आहे जी आपण रिकामेपणी सहजगत्या करू शकतो. छंद हा एक प्रकारचा उद्योग आहे जो कंटाळा आल्यावरही आपण करू शकतो. छंद आपल्या मनाला विश्रांती देतो आणि करमणूकही करतो. छंद हा एखाद्याच्या आवडीवर आणि नैसर्गिक क्षमतेवर अवलंबून असतो. आपल्या दैनंदिन कामातून काहीजण त्यांच्या मनाला मोकळे करतात तर काहीजण त्यांच्या कामाचा भर हलका करतात. सवय आणि छंद या दोन्ही अगदी विरुध्द गोष्टी आहेत. सवय ही माणसाला आपोआप लागते पण छंदाचे तसे नसते. ती आपली आवड असते आणि मनापासून आपण ते करत असतो. काही तास सलग काम केल्याने आपण दमतो आणि तेव्हा हे छंद आपल्या मनाचा थकवा घालवतात. त्यासाठी आपल्याला एखादी सुट्टी किंवा कामामध्ये काहीतरी बदल हवा असतो. अशा रिकामेपणी तो आपल्याला आराम देतो, विरंगुळा आणि आनंदही मिळवून देतो. फक्त फायदा किंवा पैसे मिळवून देणे यासाठीच त्याचा उपयोग करत नाहीत तर निर्भेळ आनंद मिळवण्यासाठी मनापासून केलेले काम म्हणजेच छंद होय.

 छंद एखाद्याला इतिहास आणि भूगोल माहित होण्यासाठी मदत करतात आणि निरनिराळ्या देशांच्या संस्कृतीशी संबंधित माहितीही देतात. गाणी ऐकल्याने मनाला शांतता मिळते आणि दुःख विसरून जाण्यास मदत होते. तर काही छंद हे आपल्या ज्ञानात भर टाकतात, करमणूकही करतात आणि आपले जीवनक्षेत्र निवडायलाही उपयोगी ठरतात. पुस्तके वाचल्याने आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. वेगवेगळ्या बाजूने आपण विचार करयला लागतो आणि आपले ज्ञानही वाढते. कविता करणे हाही एक कल्पक छंद आहे. पेंटिंग करणे, गाणी ऐकणे, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर डेव्हलपमेन्ट, ग्राफिक्स डीझायनींग असेही छंद असू शकतात. एखाद्या कल्पकतेने केलेल्या उत्पादनाला भलेही काही व्यावसायिक महत्त्व नसेल पण तरी तो छंद आपल्याला एक प्रकारचे समाधान देऊन जाईल.

 शिकारी आणि मासेमारी करणे हे खेळीमेळीचे शिवाय धाडसी छंद आहेत. बागकाम हा एक उत्तम बाह्य छंद आहे. हा छंद सगळ्यांसाठी आवड निर्माण करणारा आहे. झाडाची देखभाल करणे, त्याला खत-पाणी घालणे, त्यांच्या पानांची काळजी घेणे, वेगवेगळ्या रंगांच्या कळीचे फुल होताना बघणे, त्यांचा दरवळलेला सुंदर सुगंध घेणे ही अतिशय आनंददायी आणि मनाला तजेला देणारी गोष्ट अनुभवायला मिळेल. जेव्हा हे सगळे आपल्या आवडत्या छंदापासून होत असेल तेव्हा ते जास्तच छान होईल आणि तेव्हा होणारा आनंद हा अद्वितीय असेल. पक्षी पाहणे, त्यांच्या उडण्याची लकब, आपल्या मनात कलेच्या वेगवेगळ्या भौमितिक आकृत्या तयार करतील. तारे न्याहाळणे हा छंद एक प्रकारचे तत्त्वज्ञान शिकवतो की मनुष्य हा सृष्टीच्या महासागरामधला एक छोटा थेंब आहे. छंद हे वेगवेगळ्या प्रकरचे असतात. काही घरामधील असतात आणि तर काही घराबाहेरचेही  असतात. कोणतेही असले तरी छंद हे नेहमीच मन प्रसन्न करण्याचे काम करतात तर काही तन आणि मन दोन्ही प्रसन्न ठेवतात. पोस्टाची तिकिटे गोळा करणे, नाणी जमवणे, चित्रे काढणे आणि संगीत ऐकायला आवडणे, पुस्तक वाचणे या गोष्टीना आपण घरातील छंद म्हणू शकतो. चित्रे काढणे, छायाचित्रे काढणे, कविता करणे अशा प्रकारचे छंद आपण घरात आणि घराबाहेरही करू शकतो. बागकाम, शिकार करणे, मासे पकडणे, पोहणे, पक्षी निरीक्षण आणि तारे न्याहाळणे हे सगळे घराबाहेरचे छंद आहेत. पोस्टाची तिकिटे गोळा करणे आणि वेगवेगळ्या देशांची नाणी जमवणे हे छंदसुद्धा निश्चितपणे आनंद देतात.

 प्रत्येकजण हा आपापला छंद आपल्या आवडीनुसार आणि कलेनुसार निवडतो. छंद निवडण्याची विरंगुळा आणि आनंद ही मुख्य तत्त्वे आहेत. छंद हे जगण्याला एक अर्थ प्राप्त करून देतात. जगाच्या टेन्शन आणि प्रदूषणयुक्त वातावरणातून जरा वेळ का होईना पण आपली सुटका करतात. छंद हे फक्त आनंदच देत नाहीत तर ते आपल्याला शिकवतातसुद्धा. शिवाय उत्सुकताही वाढवतात.

‘रिकामे मन, शैतानाचे घर’ असे म्हणतात, ते काही खोटं नाही. रिकामा वेळ असेल तर मनात काही न काही विचार चालूच राहतात अशा वेळी छंद हे खूप महत्त्वाचे काम करतात. काही माणसे चांदीचा चमचाच घेऊन जन्माला आलेली असतात ज्यांना काहीच  काम नसते पण गडगंज संपत्ती असते आणि हाती वेळच वेळ असतो. त्यांचा वेळ हा व्यर्थ जातो. अशा वेळी छंद अशा लोकांना कल्पक करू शकतात. उतार वयात किंवा रिटायरमेंट नंतर वेळ जाण्यासाठी छंद हे एक वरदानच म्हंटले तर वावगं ठरणार नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या फावल्या वेळेचा सदुपयोग होतो  तो म्हाताऱ्या माणसांना व्यस्त ठेवतो आणि त्यामुळे ते त्यांचे जीवन उत्साहात जगू शकतात. म्हणूनच एखादातरी छंद जोपासुया आणि अपार आनंदाने आपले जीवन भरवून टाकूया.

– विद्या गायकवाड

Email
Facebook
Twitter
Pinterest

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top